बॉलिवूडचा गुणी अभिनेता म्हणजे आशुतोष राणा. ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून करिअरची सुरुवात करणा-या आशुतोषचा आज वाढदिवस. यानंतर आशुतोष चित्रपटात आला आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सर्वांचा लाडका झाला. जख्म, संघर्ष, दुश्मन अशा अनेक चित्रपटातील त्याची शानदार अदाकारी प्रेक्षकांना प्रचंड भावली.
‘संघर्ष’ या चित्रपटात त्याने साकारलेली सायको किलरची भूमिका असो किंवा ‘शबनम मौसी’ या चित्रपटातील किन्नरची भूमिका आशुतोषने प्रत्येक भूमिकेत अक्षरश: जीव ओतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात करिअरच्या सुरूवातीला याच आशुतोषला महेश भट यांनी सेटवरून हाकलून लावले होते.
आशुतोष राणा त्यावेळी स्ट्रगल करत होता. एकदा तो महेश भट यांना सेटवर भेटायला गेला. त्याने महेश भट समोर दिसताच त्याने त्यांना वाकून नमस्कार केला. पण आशुतोषच्या या वागण्याने महेश भट इतके संतापले की त्यांनी आशुतोषला सेटवरून अक्षरश: हाकलून लावले. याचे कारण म्हणजे, महेश भट यांना कुणीही त्यांच्या पाया पडलेले आवडायचे नाही. इतकी अपमानास्पद वागणूक मिळूनही आशुतोषने हिंमत सोडली नाही. तो वारंवार सेटवर गेला आणि प्रत्येकवेळी त्याने महेश भट यांना वाकून नमस्कार केला. महेश भट प्रत्येकवेळी संतापले. अखेर एक दिवस, मी इतका संतापतो तरीही तू माझ्या पाया का पडतोस? असे महेश भट यांनी आशुतोषला रागात विचारले. यावर आशुतोषने काय उत्तर द्यावे?
मोठ्या व्यक्तिंना चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेणे, माझ्यावरचा संस्कार आहे. तो मी सोडू शकत नाही, असे उत्तर आशुतोषने दिले. त्याचे हे उत्तर ऐकून महेश भट यांनी त्याला अलिंगण दिले. सोबत ‘स्वाभिमान’ या मालिकेत त्याला रोलही दिला. पुढे महेश भट यांच्या अनेक चित्रपटांत आशुतोषने काम केले.