अभिनेत्री अश्विनी भावे यांचा ‘मांजा’ हा चित्रपट २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे टिझर, ट्रेलर आणि पोस्टर प्रेक्षकांना भावले आहे. या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढताना दिसत आहे. पालक आणि मुलांच्या नात्यावर भाष्य करणारा मांजा हा सिनेमा आहे. आजवर कधीही न हाताळलेला विषय या चित्रपटात हाताळला गेला आहे. बालक पालक फेम रोहित फाळके आणि डान्स इंडिया डान्स फेम सुमेध मुद्रलकर या चित्रपटात झळकले आहेत. या सिनेमाची कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे. पालक मुलांचे नातं दृढ करणारी आणि या नात्याला नवे वळण देणारी ही गोष्ट आहे. या सिनेमाविषयी अश्विनी भावे सांगतात, ‘माझा मुलगा हा अतिशय अबोल आहे. त्याला कोणामध्ये मिसळायला आवडत नाही. मी एकटी त्या मुलाचा सांभाळ करते आहे, त्याला वाढवते आहे. तसेच आपल्या मुलाच्या मानसिक सक्षमीकरणासाठी झटत आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीचा सामना कसा करायचा हे त्याला शिकवत आहे. लोकमतला दिलेल्या भेटीत त्यांनी आपल्या आधीच्या भूमिकांविषयी आणि चित्रपटसृष्टीत झालेल्या स्थित्यंतराविषयी गप्पा मारल्या. त्या सांगतात, ‘सुरुवातीला नायक नायिकांना प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असावं लागायचं. डान्स, हावभाव, संवाद यांत सहजता यावी म्हणून प्रॅक्टिस करावी लागायची. आता मात्र असं बंधन नाही. आज खूप संधी निर्माण झाल्या आहेत. पूर्वी मोजकेच चित्रपट असल्याने भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहायच्या. पण आता ही गोष्ट देखील बदलली आहे. परंतु टेक्नॉलॉजी मध्ये झालेल्या बदलांमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत.’‘मांजा’ चित्रपटाची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन जतिन वागळे यांनी केलं आहे. दिग्दर्शकाचे परफेक्शन यातील गाण्यातून व गोष्ट सांगण्याच्या पद्धतीवरून नक्कीच दिसून येईल. ‘इंडिया स्टोरीज’ निर्मित ‘मांजा’ चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे संवाद उपेंद्र सिधये यांनी लिहिले आहे. नितीन केणी आणि मनीष वसिष्ट यांची एमएफडीसी ही कंपनी या चित्रपटाचे वितरण साहाय्य्य करणार आहे.
अश्विनी भावेंचा ‘मांजा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:18 AM