लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde), अशोक सराफ (ashok saraf) , निवेदिता सराफ (nivedita saraf) , अश्विनी भावे (ashvini bhave), वर्षा उसगांवकर (varsha usgaonkar) या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीने मराठी कलाविश्वातील एक काळ गाजवला. विशेष म्हणजे यातील प्रत्येक कलाकार लोकप्रियतेच्या आणि यशाच्या शिखरावर होता. मात्र, तरीदेखील त्यांच्यात कधीच स्पर्धा, मतभेद नव्हते. या कलाकारांमध्ये त्याकाळीही उत्तम मैत्री होती आणि आजही आहे. अलिकडेच त्यांच्यातील मैत्रीचा प्रत्यय नेटकऱ्यांना आला. निवेदिता सराफ यांच्यासाठी अश्विनी भावे यांनी चक्क मुंबई गाठली.
निवेदिता सराफ सोशल मीडियावर सक्रीय असून कायम त्या त्यांच्या प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात. यामध्ये त्यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांच्यासोबत अश्विनी भावे दिसून येत आहेत. तसंच अमेरिकेवरुन त्या खास निवेदिता सराफ यांच्यासाठी आल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.
'भाग्य दिले तू मला' या मालिकेसह निवेदिता सराफ 'मी स्वरा आणि ते दोघं' या नाटकाचे प्रयोग करत आहेत. याच नाटकासाठी अश्विनी भावे यांनी मुंबई गाठली. 'माझी मैत्रीण अश्विनी भावे हिनं माझं 'मी स्वरा आणि ते दोघं' हे नाटक पाहिलं, तिला भेटून मला खूप आनंद झाला,' असं कॅप्शन निवेदिता सराफ यांनी दिलं.
दरम्यान, निवेदिता सराफ आणि अश्विनी भावे यांनी अशी ही बनवाबनवी सिनेमात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून या दोघींमधील मैत्री आजपर्यंत कायम आहे.अश्विनी सध्या सॅन फ्रान्सिस्को येथे राहतात. अमेरिकत असूनही त्या कामानिमित्त भारतात येत- जात असतात.