अभिनेत्री अश्विनी महांगडे ( Ashvini Mahangade ) हिने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. साताऱ्यातील वाईमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत अश्विनीने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. अश्विनीला शरद पवार गटात महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीचं उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर आश्विनीच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याचं आश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं होतं. कार्यक्रमाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर तिने आता आणखी एक पोस्ट केली आहे. राजकारणात प्रवेशानंतर अश्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. यात आश्विनीने वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात. तिने लिहलं, "नाना…. तुमची सगळी स्वप्नं मी पूर्ण करेन.. जबाबदारीने…". तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अश्विनी ही मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. 'आई कुठे काय करतेट, 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकांमुळे अश्विनी घराघरांत लोकप्रिय झाली. अनेकदा राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं स्पष्ट मत मांडत असल्याचं पाहायला मिळालं आहे. आश्विनी गेल्या अनेक वर्षांपासून 'रयतेचं स्वराज्य प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेअंतर्गतही ती सामाजिक कार्ये करत आहे.