Join us

उत्तम कहाणी, पंकज त्रिपाठींची भूमिका असूनही 'मै अटल हूँ' कुठे पडला कमी? थोडक्यात वाचा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:48 AM

कसा आहे 'मै अटल हूँ' सिनेमा वाचा...

आपल्या जीवनकाळात देशालाच सर्वात आधी प्राधान्य देणारे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Bajpayee). कवी मनाचे अटल देशाचे १० वे पंतप्रधान होते. एक प्रामाणिक माणूस म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जातं. दिग्दर्शक रवी जाधव यांनी अटलजींच्या जीवनावर 'मै अटल हूँ' हा सिनेमा बनवला जो नुकताच रिलीज झाला आहे. प्रतिभावान अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी सिनेमात त्यांची भूमिका साकारली आहे. उत्तम कथा आणि पंकज त्रिपाठींसारखे अभिनेते असूनही सिनेमा फारसा प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला दिसत नाही. बघुया सिनेमाचा थोडक्यात रिव्ह्यु...

'मै अटल हूँ' सिनेमात अटल बिहारी वाजपेयी यांचं बालपण ते कारगिल युद्धात त्यांनी पाकिस्तानला कशी धूळ चारली असा सर्व घटनाक्रम दाखवला आहे. पोखरणमध्ये परमाणु बाँबची झालेली चाचणीही यामध्ये दाखवण्यात आली आहे. अटल बिहारी वाजपेयी खऱ्या आयुष्यात कसे व्यक्ती होते, त्यांच्या आयुष्यात देशाप्रती किती आदर होता याचा अंदाज सिनेमातून येतो. आपल्या कवितांमधून ते त्यांचं म्हणणं उत्तमरित्या पोहचवायचे. एक कवी, पत्रकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य म्हणून त्यांनी काय काय कार्य केलं याची झलक सिनेमातून दिसते. 

सकारात्मक गोष्टी- सिनेमाबाबतीत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अटलजींचे कॉलेजचे दिवस, आरएसएसमधील योगदान, राष्ट्र धर्म पत्रिकेसाठी त्यांचं नाव, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांच्यासोबत त्यांचं नातं, अखिल भारतीय जनसंघाची निर्मिती, पंडित नेहरुंसोबतची त्यांची भेट, राम मंदिर वाद आणि कारगिल युद्ध या सर्व घटना मनाला भिडतात. मध्यंतरानंतरचा भाग प्रेक्षकांना जास्त आवडला आहे.

नकारात्मक बाजू- सिनेमात असा एकही सीन नाही जो तुमच्या कायम स्मरणात राहील. पंकज त्रिपाठी यांनी अटलजींच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली दिसते. मात्र तरीही त्यांचा अभिनय काहीसा फिका पडला आहे. त्यांच्याकडून जितकी अपेक्षा होती त्यापैकी काही प्रमाणातच ते पूर्ण करु शकले आहेत. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाची महत्वाची जबाबदारी होती. यासाठी त्यांनी प्रचंड संशोधन केल्याचं दिसतं. मात्र तरी दिग्दर्शनात सिनेमाने मार खाल्ला आहे. पहिला भाग कंटाळवाणा आहे दुसऱ्या भागापासून सिनेमा पकड घेतो. मात्र या नादात सीन्स खूपच वेगाने पुढे गेल्याचं जाणवतं. 

एकंदर सिनेमा नक्कीच एकदा पाहण्यासारखा आहे. मात्र दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफीमध्ये सिनेमा कमी पडला आहे.

टॅग्स :पंकज त्रिपाठीअटलबिहारी वाजपेयीरवी जाधवसिनेमा