Join us  

अती तिथे मस्ती - ग्रेट ग्रँड मस्ती

By admin | Published: July 16, 2016 10:23 AM

ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमाच्या निंदेवर जाऊ नका. हा सिनेमा अश्लीलतेच्या माध्यमातून खूप चांगला संदेश देतो.

- जान्हवी सामंत 

रेटिंग: दीड स्टार

कास्ट :  विवेक ऑबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, उर्वशी रौतेला आणि तीन अनोळखी मुली
 
या सिनेमाच्या निंदेवर जाऊ नका. हा सिनेमा अश्लीलतेच्या माध्यमातून खूप चांगला संदेश देतो. मस्ती = सेक्स, सेक्स = जीवन आणि करवा चौथ = प्रेम आणि म्हणून सेक्स = प्रेम. असे खूप महत्त्वाचे तत्वज्ञान ग्रेट ग्रँड मस्ती हा सिनेमा शिकवून जातो. बारकाईमध्ये न जाता, ही गोष्ट आहे तीन मित्रांची. अमर, प्रेम आणि मीत. हे तिघेही बिचारे चांगले असतात . पण घरच्या परिस्थितीमुळे बिचारे आपल्या बायकांसोबत सेक्स करू शकत नसतात. 
रितेशची सासू (उषा नाडकर्णी) त्याला त्याच्या बायकोसोबत एकांत देत नसते. आफताबच्या सुंदर मेहुणीमुळे त्याला त्याच्या बायकोसोबत वेळ घालवता येत नसतो आणि विवेकचा प्रोब्लेम तर फारच अजब असतो. त्याच्या बायकोचा एक जुळा भाऊ असतो. त्यामुळे विवेकने बायकोला प्रेमाने हात लावला की त्याचा मेहुणा रोमँटिक होतो. यामुळे त्यांची सेक्स लाईफ खूप निराशाजनक झालेली असते. रोज रोज कुठलीतरी कामवालीबाई, पेशंट अथवा बायकोच्या मैत्रिणीकडे बघून बघून ते कंटाळलेले असतात. ते एक दिवस ठरवतात की त्यांना लाईफमध्ये काहीतरी मस्ती पाहिजे. म्हणून ते रितेशच्या गावी निघतात, जिकडे त्याच्या पूर्वजांची एक हवेली असते. या हवेलीमध्ये एक भूत (उर्वशी रौतेला) असते. पण त्या तिन्हीमधला कोणी एक आशिक शहीद होण्यापूर्वी त्यांच्या बायका आणि त्यांचे नातेवाईक तिथे पोहोचतात. नवऱ्याला भूतापासून वाचवायला बिचाऱ्या बायका करवा चौथही ठेवतात. 
रितेश-विवेक-आफताबमधील टायमिंगमुळे बरेच फालतू विनोद चालून जातात. उर्वशी रौटेला अंगप्रदर्शनापुरतीच आहे. खरे तर या सिनेमात कथा, हेतू, लॉजिक शोधण्यात काहीच अर्थ नाही. कारण मुळात हे जेनर या चौकटीत बसतच नाही. सेक्स कॉमेडी अशाच असतात आणि त्या जितक्या अश्लील तितक्या त्या चांगल्या. मुळात अशा फिल्मस या सूसू-शीशी विनोदांपेक्षा फार वेगळ्या नाहीत. त्यामुळे त्यात फार काही बौद्धिक अपेक्षा ठेवणे ही आपलीच चूक ठरेल.
सेक्स विनोद आणि अंगप्रदर्शनामध्ये काही कंजुषी केलेली नाही. याचे श्रेय लेखक तुषार हिरानंदानी, पटकथालेखक आकाश कौशिक आणि संवाद लेखक मधुर शर्मा यांना दिलेच पाहिजे. वाह्यातपणा आणि अश्लील जोक्स - दूध, कंडोम, वायग्रा, केळी इत्यादी गोष्टींवर बराच सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणजे रितेश देशमुखने पँट काढून उषा नाडकर्णीसोबत रोमान्स करावा ही कल्पनाच इतकी धडकी भरणारी आहे की उवर्शी रौतेलाच्या भूताच्या भूमिकेचा यापुढे काहीच प्रभाव वाटत नाही. नेहमी खरे बोलावे, बायकोशी एकनिष्ठ राहावे, करवा चौथचा उपवास करावा असे स्वतःमध्ये आत्मसात करण्यासारखे या सिनेमात खूप काही आहे. टेलिव्हिजनवर सिनेमा येईल तेव्हा जरूर पाहा. तुम्हाला कळेलच.