‘वानप्रस्था’कडे प्रवास सुरु...! अतुल कुलकर्णी यांनी घेतली ‘निवृत्ती’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:25 PM2021-02-01T14:25:04+5:302021-02-01T14:25:43+5:30
अतुल यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती
हिंदी, मराठीसह तेलगू, कन्नड, मल्याळम, तामिळ अशा विविध भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते अतुल कुलकर्णी निवृत्त होत आहेत. धक्का बसला ना. पण अभिनयातून नाही तर QUEST नामक त्यांच्या संस्थेतून.
होय, खुद्द अतुल यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. 2007 रोजी काही मंडळींनी एकत्र येऊ शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन केली होती. स्थापनेपासून अतुल कुलकणी या संस्थेचे अध्यक्ष होते. पण आता त्यांनी या संस्थेतून निवृत्त होत असल्याचे जाहिर केले आहे.
‘गणितात एक सिग्मॉइड कर्व्ह नावाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार, जेव्हा सर्व काही छान चाललेलं असतं आणि तुम्ही एखाद्या गोष्टीच्या शिखरावर असता, तेव्हाच तुम्ही ‘एक्झिट’ घ्यायला हवी. माझा या सिद्धांतावर विश्वास आहे. शिवाय आपल्या कडच्या ‘आश्रम’ या व्यवस्थेवरही माझा विश्वास आहे. सध्या मी हळूहळू माझ्या आयुष्याच्या वानप्रस्थाकडे प्रवास सुरू केला आहे, असे लिहित अतुल यांनी निवृत्तीची घोषणा केली.
माझं मनोगत😊https://t.co/36Uk7HJNsypic.twitter.com/nwefY5Kqi8
— atul kulkarni (@atul_kulkarni) February 1, 2021
माझ्या वैयक्तिक आणि इतर सामाजिक जबाबदा-या कमी करणं, माझ्या अभिनयाच्याच क्षेत्रात राहून पण काही वेगळं करून पाहणं, काही जुनं विसरणं, काही नवीन शिकणं, नवीन प्रदेश/परिसर धुंडाळणं, आत्ताचा कम्फर्ट झेन सोडण्याचा प्रयत्नं करणं असं बरंच काही त्यात आहे. QUEST मधून निवृत्त होणं हा त्यातलाच एक मोठा भाग, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.