मराठी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेते आणि चतुरस्त्र कलाकार अतुल परचुरे यांचं निधन झालंय. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारपणामुळे अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड गेले. अतुल परचुरे यांनी काही महिन्यांपूर्वी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. इतकंच नव्हे तर काहीच दिवसांपूर्वी एका मराठी नाटकातून ते रंगभूमीवर पुन्हा दणक्यात कमबॅक करणार होते. परंतु अतुल परचुरेंना पुन्हा एकदा रंगभूमीवर अभिनय करताना बघण्याची इच्छा अपूर्णच राहिली.
या नाटकातून अतुल परचुरे करणार होते कमबॅक
अभिनेते सुनील बर्वेंच्या सुबक या प्रॉडक्शन संस्थेअंतर्गत सूर्याची पिल्ले हे नाटक रंगभूमीवर सादर होणार होतं. या नाटकात अतुल परचुरे पांडूअण्णा ही व्यक्तिरेखा साकारणार होते. या नाटकाचं पोस्टरही छापून आलं. शुभारंभाचा प्रयोगही ठरला. परंतु अतुल परचुरे यांना प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितल्याने अतुल परचुरे यांच्या जागी स्वतः सुनिल बर्वे या नाटकात काम करायला सज्ज झाले. त्यामुळे अतुल परचुरेंच्या चाहत्यांना पुन्हा एकदा अतुल यांना रंगभूमीवर अभिनय करताना पाहण्याची इच्छा राहूनच गेली.
अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड
मराठी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिंमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते ठणठणीत बरे झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र आता त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.