प्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा स्वतः अक्षय कुमारने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढायला लागली आहे. तसेच ‘चुंबक’ चित्रपटातील गाणी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. या गाण्यांना सुद्धा संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामधील पहिले गाणे “खेचा खेची, गडबड गोची” हे असून ते स्वतः स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. या गाण्याला ओमकार कुलकर्णी यांनी शब्दांकित केले असून साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे. तर दुसरे गाणे “चुंबक चिटक चिटकला चुंबक” हे गाणे बॉलीवूड मधील आघाडीचा गायक दिव्या कुमार याने गायले आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘बालगंधर्व’ फेम विभावरी देशपांडे हिने पहिल्यांदाच या सिनेमाकरीता म्हणजे ‘चुंबक चिकटला’ या शीर्षक गीताचे शब्द लिहिले आहेत. या गाण्यांची संगीत रचना अमर मंग्रुलकर यांची आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘चुंबक’ महाराष्ट्रात सर्वत्र २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले प्रख्यात गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असून प्रमुख भूमिका असलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून अरुणा भाटीया, केप ऑफ गुड फिल्म आणि कायरा कुमार क्रिएशन च्या नरेन कुमार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
यावेळी विभावरी देशपांडे म्हणाली की ‘गीतकार म्हणून चुंबक चित्रपटातील हे माझे पहिलेच व्यावसायिक गाणे आहे. मला त्यावेळी असे सांगण्यात आले होते की या गाण्यातील शब्द साधे आणि सोपे असावेत. चुंबकचा अर्थ असा होतो की चिटकणारा जो सुटता सुटत नाही चिटकून बसतो असे मला काहीतरी बोल लिहून द्यायचे होते. ते मी माझ्यापरीने पूर्ण केले आहे. मला वाटत की सगळ्यांना हे गाणे नक्कीच आवडेल’.
“हे जे गाणे आहे ते एक प्रोमो सॉंग आहे जे मुख्यता नायकाच्या भूमिकेबद्दल आहे. नायक कशामुळे अस वागतो त्याच्या आयुष्यात काय घडत. आम्ही मुख्यता चुंबक जो शब्द आहे तोच एक शब्द धरून गाणे बनवले आहे. या गाण्यांच्या शब्दांवर खुप चर्चा करून शेवटी आम्ही दिव्या कुमार याचे नाव नक्की केले’ असे मत म्यूजिक कंम्पोजर अमर मंग्रुलकर यांनी व्यक्त केले.
बॉलीवूडमधील आघाडीचा गायक दिव्या कुमार म्हणाला की ‘मी पहिल्यांदाच अमर सरांना चुंबक चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने भेटलो. मराठी गाण्यात भरपूर विविधता आहे. “चुंबक चिटकला चुंबक” हे गाणे खुपच मजेदार झाले आहे आणि मला हे गाणे गाताना मजा आली’.
स्वानंद किरकिरेने यांतील प्रसन्नाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सोलापूरमधील एका छोट्या गावातील गतिमंद आणि सरळसाध्या अशा व्यक्तीची ही भूमिका आहे. स्वानंद अगदी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. यातील तीन मध्यवर्ती व्यक्तीरेखांपैकी एक असलेली ‘डिस्को’ची भूमिका चित्रपटात पदार्पण करत असलेला कोल्हापूरचा संग्राम देसाई करत आहे. परराज्यातून आलेल्या आणि मुंबई मोबईल रिपेरिंगचे काम करणाऱ्या तरुणाची ही व्यक्तिरेखा आहे. ‘बाळू’ या चित्रपटातील तीन मुख्य व्यक्तीरेखांपैकी एक महत्वाचे पात्र. ही व्यक्तिरेखा चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पुणे येथील साहिल जाधवने साकारली आहे. तो आपले एक छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो आहे. तो त्यासाठी एका हॉटेलात वेटरचे काम करतो आहे.