Join us

प्रेक्षकांना हसवणं सर्वांत कठीण-अभिनेता प्रसाद ओक

By अबोली कुलकर्णी | Published: October 11, 2018 6:51 PM

वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून आपले वेगळेपण सिद्ध करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे प्रसाद ओक़ विविधांगी भूमिका साकारून त्याने कलेचे प्रत्येक अंग आपलेसे केले. अलीकडेच त्याच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मराठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला.

दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून आपले वेगळेपण सिद्ध करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे प्रसाद ओक़ विविधांगी भूमिका साकारून त्याने कलेचे प्रत्येक अंग आपलेसे केले. अलीकडेच त्याच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मराठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. एका विनोदी कार्यक्रमात तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसत असून यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही हितगुज...                      * ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मराठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळालाय. काय सांगशील?-  खरंच, खूप आनंद आणि अभिमानाची बाब आहे. राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार हे इंडस्ट्रीतील सर्वांत मानाचे समजले जाणारे दोन पुरस्कार. ते कच्चा लिंबूला मिळाल्यामुळे टीमच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटत आहे.

 *  एका मराठी विनोदी कार्यक्रमात तू परीक्षक म्हणून दिसत आहेस. कसं वाटतंय?- खूप छान वाटते आहे. खरंतर मी आत्तापर्यंत गायक, सुत्रसंचालक, अभिनेता या सगळयांच प्रकारांत प्रेक्षकांसमोर आलो. मात्र, परीक्षकाच्या भूमिकेत मी अद्याप त्यांच्यासमोर आलो नव्हतो, त्यामुळे या शोच्या निमित्ताने ती व्यक्तीरेखा मी एन्जॉय करतोय. नक्कीच खूप चांगला अनुभव आहे.

 * तुझे फेसबूकचे अकाऊंट व्हेरिफाईड झाले आहे. कसे वाटते आहे?- माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. अनेक वेळा लोकांना शंका असते की, हा तोच व्यक्ती आहे का? अकाऊंट व्हेरिफाईड झाले की, मग त्यांनाही खात्री पटते की, फेसबुकने अकाऊंट व्हेरिफाईड केले म्हणजे हा योग्य व्यक्ती आहे. मग ते पोस्ट लाइक आणि शेअर करतात. 

 * तू अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटके, कॉमेडी शोजमध्ये काम केलं आहेस. कसं वाटतं मागे वळून बघताना?- मी १९९६ पासून इंडस्ट्रीत काम करतोय. अभिनयाच्या क्षेत्रातील अनेक चढ-उतार मी पाहिले. खूप शिकायला मिळाले. अजून अनेक गोष्टी शिकतो आहे. अभिनय क्षेत्रामुळे आयुष्य समृद्ध झाले.

 * ‘हम तो तेरे आशिक हैं’ या कॉमेडी मालिकेत तू काम करत आहेस. याचा तुला काही फायदा झाला का? किती कठीण आहे विनोदी भूमिका साकारणं?- विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवणं सगळयांत कठीण काम असतं. मला विनोदी भूमिका साकारणं आव्हानात्मक वाटतं. गेल्या ८-१० वर्षांपासून मी आणि पुष्करने एकत्र काम केले नव्हते. या मालिकेच्या निमित्ताने ती माझी इच्छा पूर्ण झाली.

 * तू थिएटर देखील केलं आहेस. तुझी अनेक नाटकं गाजलीत. किती महत्त्वाचं असतं एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात थिएटरमध्ये काम करणं?- नक्कीच, खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला जर अभिनयाचा कळस गाठायचा असेल तर थिएटर हा पाया तुमचा मजबूत असलाच पाहिजे. थिएटरमधून तुम्ही बरंच काही शिकू शकता. 

 * दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, गायक, कवी, होस्ट या सगळयांच प्रकारात तू काम केलं आहेस. पण, यातील तुला कम्फर्टेबल वाटणारं काम कोणतं?- दिग्दर्शक म्हणून काम करणं मला आवडतं. ती जबाबदारी मला माझ्या जवळची वाटते. त्याच भूमिकेत मी स्वत:ला जास्त कम्फर्टेबल मानतो.

 * एखादा प्रोजेक्ट स्विकारताना तुझ्यासाठी कोणती बाब जास्त महत्त्वाची असते?- असं काहीच नाही. खरंतर मी एखादा प्रोजेक्ट स्विकारत असताना तो मी कधी मित्रासाठी करतो, कधी व्यवसाय म्हणून करतो. कधी माझ्या मनाचं समाधान होण्यासाठी करतो. 

 * ‘ओक-ठोक’ विषयी जाणून घ्यायला आवडेल..- ‘ओक-ठोक’ हा माझा एकपात्री स्टँडअप कॉमेडी शो आहे. त्याचे अशातच अबूधाबीमध्ये उद्घाटन झाले. आता आॅस्ट्रेलिया, दुबई आणि सिंगापूर येथेही मी शो करीन.

 * वेगवेगळया प्रोजेक्टमध्ये गुंतलेला असताना कुटुंबासाठी वेळ कसा काढतोस?- मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी त्यांच्यासाठी नक्की वेळ देतो. त्यांच्या गरजा पूर्ण करतो. त्यांच्यासोबत सिनेमे, नाटके एन्जॉय करतो. पण, जेव्हा मी काम करत असतो तेव्हा फक्त कामालाच प्राधान्य देतो. 

टॅग्स :प्रसाद ओक फिल्मफेअर पुरस्कार २०१८पुष्कर श्रोत्री