Join us

जंगली चित्रपटाच्या ट्रेलरला मिळतोय प्रेक्षकांचा असा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 9:00 PM

जंगली या फिल्मच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षक सोशल मीडियावर ‘मुला-बाळांसह थिएटरमध्ये जाऊनच हा सिनेमा पाहाणार’ असे सांगत आहेत.

ठळक मुद्देकाहींनी हा ट्रेलर पाहिल्यानंतर विद्युत जामवालला जंगलाचा सुपरहिरो म्हटले आहे, तर काहींच्या मते त्याची व्यक्तिरेखा म्हणजे भारताने टारझनला दिलेले उत्तर आहे.

जंगली हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर खास लहान मुलांसाठी निर्माण करण्यात आलेला हा चित्रपट आहे.

लहान मुलांच्या उन्हाळी सुट्टीतील पहिली अपॉइंटमेंट जंगलीसोबत नक्की घ्या असे या चित्रपटाचे निर्माते आवर्जून सांगत आहेत. या चित्रपटात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत असून या फॅमिली अॅक्शनपटात तो जिगरबाज साहस करताना दिसणार आहे. एक पुरुष आणि वन्यजीवातील दृढ मैत्रीचे चित्रण असलेला हा सिनेमा मनाला साद घालणारा ठरणार आहे. जंगलीचे कथानक विद्युत जामवालच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणार असून त्याच्या वडिलांनी केलेले हत्ती संवर्धन, त्यांची आंतरराष्ट्रीय शिकारी टोळीसोबतची धुमश्चक्री यांचा विद्युत वेध घेणार आहे.  

या सिनेमासाठी खऱ्या हत्तींसोबत शॉट घेण्यात आले असून हत्तीदेखील या चित्रपटाच्या कथेचा महत्त्वाचा भाग आहेत. ही कथा केवळ मनुष्य-प्राण्याच्या मैत्रीपुरती मर्यादित नसून यामध्ये पूर्वी कधीही न पाहिलेली प्राण्यांची साहसी दृश्ये, कलारीपयट्टू सारखे प्राचीन मार्शल आर्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या फिल्मच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षक सोशल मीडियावर ‘मुला-बाळांसह थिएटरमध्ये जाऊनच हा सिनेमा पाहाणार’ असे सांगत आहेत. काहींनी हा ट्रेलर पाहिल्यानंतर विद्युत जामवालला जंगलाचा सुपरहिरो म्हटले आहे, तर काहींच्या मते त्याची व्यक्तिरेखा म्हणजे भारताने टारझनला दिलेले उत्तर आहे.

फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने या चित्रपटाविषयी ट्वीट केले आहे की, “जंगली हे एक साहस असून ते मुलांना, कुटुंबांना नक्कीच पसंत पडणारे आहे... मनुष्य आणि हत्तींमधील सुंदर नात्याची संकल्पना मांडणारी ही कलाकृती आहे” तर चित्रपट समीक्षक कोमल नाहटाने सोशल मीडियावर लिहिले आहे की, “जंगलीचा ट्रेलर अप्रतिम आहे. तो पाहताना मी रोमांचित झालो. ही फिल्म बऱ्याच प्रसंगात तुम्हाला नक्कीच टाळ्या वाजवायला भाग पाडेल. दोन पिढ्यांच्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा अद्भुत ठरेल. कारण चार दशकांनंतर पहिल्यांदा मुख्य प्रवाहात मनुष्य-प्राणी यांच्यातील दृढ नाते चित्रित करण्यात आले आहे.”  

जंगली या चित्रपटाची निर्मिती विनीत जैन यांनी केली असून या चित्रपटाचा सह-निर्माता प्रीति शहानी आहे. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. 

 

टॅग्स :विद्युत जामवालजंगली