‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या सिरीजमधील अॅव्हेंजर्स एंडगेम हा शेवटचा चित्रपट असून या चित्रपटाची गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या कित्येक शोची अॅडव्हान्स बुकिंग देखील झाली आहे. केवळ भारतातच नव्हे तर देशभर या चित्रपटाला फॅन फॉलॉव्हिंग असून हा चित्रपट काल जगभरामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटासाठी पहिल्यांदाच 24 तास चित्रपटगृह सुरू राहाणार असून अनेक चित्रपटगृहात या चित्रपटाचे 72 तास सलग प्रयोग होणार आहेत. या चित्रपटाची तिकिटं हजारो रुपयांची असली तरी प्रेक्षक पैसे खर्च करून हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहात आहेत. या चित्रपटाला केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाच्या बाबतीतली एक बातमी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. हा चित्रपटात पाहायला चीनमधील एक महिला चित्रपटगृहात गेली होती. हा चित्रपट पाहून ही महिला इतकी भावुक झाली होती की, तिला तिचे अश्रू आवरत नव्हते. ती चित्रपटगृहातच जोराजोरात रडायला लागली. ही महिला इतकी रडली की, शेवटी तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
अॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाचा पहिला शो काल रात्री चीनमध्ये झाला. त्यावेळी निंगबो शहरातील एक महिला हा चित्रपट पाहाण्यासाठी गेली होती. चित्रपट पाहाताना ती प्रचंड रडल्यामुळे तिच्या छातीत दुखू लागले आणि तिला श्वास घ्यायला त्रास झाला. तिची परिस्थिती अतिशय वाईट असल्याने तिला अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दरम्यान तिच्या हातापायांना आखडी आल्याने तिची अवस्था आणखी वाईट झाली होती. त्यामुळे तिला रुग्णालयला नेल्यानंतर लगेचच तिला ऑक्सिजन मास्क लावण्यात आला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर देखील तिचे रडणे थांबलेच नव्हते. अखेर तू शांत होईपर्यंत आम्ही उपचार करू शकत नाही असे डॉक्टरांनी तिला सांगितल्यावर ती थोडी शांत झाली आणि त्यानंतरच तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचार केल्यानंतर काही तासात तिला घरी सोडण्यात आले.