'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. या मालिकेत राधिकाची भूमिका साकारुन नावारुपाला आलेली अनिता सध्या 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत रमाची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामध्येच अनिताने 'लोकमत फिल्मी'ला एक छोटेखानी मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या नवऱ्याविषयी भाष्य केलं आहे.
लोकमतच्या ऑक्वर्ड रॅपिड फायर या खेळात अनिताला काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तर देत तिच्या नवऱ्याविषयी भाष्य केलं. तसंच तिच्या नवऱ्याला कोणत्या गोष्टीचा राग येऊ शकतो हेदेखील तिने सांगितलं. इतकंच नाही तर मी त्याला टोपणनाव दिलं तर तो मला घरातून बाहेर काढेल असं ती मस्करीत म्हणाली.
'तू तुझ्या नवऱ्याला कोणत्या टोपणनावाने हाक मारतेस?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, "मी कधीच माझ्या नवऱ्याला बाबू, सोना अशा नावांनी हाक मारत नाही. त्याला त्रास देण्यासाठी मी असं काही केल नाहीये अशातला भाग नाहीये. पण, त्याचा त्याला फार त्रास होतो. त्याचं नाव सोडून वेगळ्या नावाने त्याला बोलावलं,किंवा त्याच्या नावाचं काही भलतंच केलं तर त्याला राग येतो. त्यामुळे त्याचं नाव चिन्मय आहे आणि मी त्याच नावाने त्याला हाक मारते", असं अनिता म्हणाली.
दरम्यान, अनिता मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री असल्याचं दिसून येतं. नाटक, मालिका असा तिचा प्रवास आहे. अनिताने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.