Join us

Brahmastra 2: 'ब्रम्हास्त्र २' कधी रिलीज होणार? दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला, 'जर १० वर्ष लागली तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 13:37 IST

दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चित्रपट 'ब्रम्हास्त्र' चांगलाच गाजला.

Brahmastra 2: दिग्दर्शक अयान मुखर्जीचा (Ayan Mukherjee) ड्रीम प्रोजेक्ट असलेला चित्रपट 'ब्रम्हास्त्र' चांगलाच गाजला. अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, रणबीर कपूर, आलिया भट, चिरंजीवी अशी तगडी स्टारकास्ट यामध्ये होती. हा सिनेमा तयार करण्यासाठीच अनेक वर्ष गेली. जबरदस्त व्हिएफएक्स आणि स्टोरीसह सिनेमा प्रदर्शित झाला. आता ब्रम्हास्त्रच्या दुसऱ्या भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. नुकतेच अयानने दुसरा भाग कधी येणार याविषयी माहिती दिली आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जी नुकत्याच एका मुलाखतीत म्हणाला,  'ब्रम्हास्त्र २ वर आम्ही काम करत असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जर दुसरा भाग रिलीज करण्यासाठी आम्ही १० वर्ष लावली तर प्रेक्षक सिनेमा बघायला येणारच नाहीत. त्यामुळे येत्या काही वर्षात सिनेमा रिलीज होईल.'

'ब्रम्हास्त्र २ मध्ये देवच्या भूमिकेत कोण असणार याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. रणवीर सिंहपासून आमिर खान पर्यंत सर्वांचीच नावं घेतली गेली. या चर्चांवर अयान म्हणाला,'देवची भूमिका कोण साकारणार हे अजून आम्ही ठरवलेलं नाही. त्यासाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागेल. हा दुसरा भाग खूप इंटरेस्टिंग असेल हे नक्की.'

'ब्रम्हास्त्र' गेल्या वर्षी ९ सप्टेंबरला रिलीज झाला होता. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकांना सिनेमा पसंतीस पडला तर काहींनी मात्र सिनेमाची खिल्लीही उडवली. चित्रपटावर, आलिया रणबीरच्या भूमिकेवर तर अनेक मीम्सही बनले. तरी सिनेमाने बॉक्सऑफिसवर समाधानकारक कमाई केली होती. आता ब्रम्हास्त्र २ ची चाहत्यांना उत्सुकता आहे.

टॅग्स :ब्रह्मास्त्ररणबीर कपूरआलिया भटअमिताभ बच्चन