ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात स्थान दिल्याने गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेला ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचा वाद चिघळण्याची शक्यता वाढली आहे. 'ऐ दिल...'या चित्रपटच्या प्रदर्शनाला विरोध करत मुबईतील सीएसटीजवळील मेट्रो चित्रपटगृहाबाहेर आज मनसे कार्यकर्त्यांनी अंदोलन केले. अंदोलनकर्त्या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना किल्ला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मनसे कार्यकर्त्यांना अटक केल्यामुळे हा वाद आणखीन चिघळेल अशी चिंता सध्या व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या चित्रपटाला विरोध कायम असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर २८ ऑक्टोबरला देशभरात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे भवितव्य अद्याप अंधारात आहे.
दरम्यान, पाकिस्तानी कलाकाराचा समावेश असल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मल्टीप्लेक्सना पुरेशी सुरक्षा पुरविली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी निर्माता संघटनेला दिला आहे.