‘शुभमंगल सावधान’,‘बाला’,‘अंधाधुन’,‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ यासारख्या वेगवेगळया विषयांवरील चित्रपटांमध्ये अभिनेता आयुष्मान खुराणाने दमदार कामगिरी बजावली. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. आयुष्मान हा एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच गुणी गायक देखील आहे. पण, तुम्हाला माहितीये का, तो एवढा अप्रतिम गायक झाला कसा? त्याची सुरूवात? त्याचा सराव ? नेमका कसा झाला...तेच आज आम्ही तुम्हाला सांगतोय...
आयुष्मान खुराणाने नुकतेच हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल सांगितले,‘ मला माहित आहे की, मी एक आऊटसायडर आहे. मी स्टारकिड नाही. त्यामुळे मला दुसरी संधी मिळणारच नव्हती. आजचे स्टारकिड्स खूपच टॅलेंटेड आहेत. त्यांना पहिली संधी मिळते पण, त्यांच्यासाठी एक बेंचमार्क्स तयार केलेला असतो. मी जर माझ्या कामाचे ५० टक्के दिले तर लोक म्हणतात, तू तुझ्या परीने चांगले काम केलेस. स्टारकिड्स १०० टक्के मेहनत घेतात, पण तरीही प्रेक्षक समाधानी नसतात.’
आयुष्मानने त्याच्या गायनाचे सीक्रेट सांगितले,‘मी काही शोजसाठी ट्रेनमधून जायचो. तेव्हा मी गाणे म्हणून लोकांकडून पैसा मिळवायचो. प्रत्येक कलाकाराला संधी मिळते, त्याने फक्त त्याचे सोने केले पाहिजे, एवढेच. मेहनत करायला हवी.’