यंदा गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. मुंबईतील चौपाट्यांवर गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते. विसर्जनानंतर मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यावर कचरा साचल्याचं पाहायला मिळतंय. सगळीकडे अस्वच्छता पाहायला मिळतेय. गणेशोत्सव होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अम़ृता फडणवीस स्वच्छतेच्या (Cleanliness campaign) कामाला लागल्याचं दिसून आलं. यावेळी अभिनेता आयुषमान खुराणा यानेही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासत समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेला सुरवात केली होती. अमृता आणि आयुषमान खुराणा यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी वर्सोवा किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबवली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये अमृता आणि आयुषमान हे आपल्या हाताने किनारे स्वच्छ करताना दिसून येत आहेत. किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ केला. त्यांच्या मोहिमेचं नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील हजारो सार्वजनिक मंडळ तसेच गणेशभक्त मोठ्या भक्तिभावाने समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करतात, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांपैकी अनेक मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावर येऊन वाळूत रुततात. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील दृश्य उदासीनतेचे असते. त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये आणि समुद्र किनारा स्वच्छ राहावा म्हणून ही स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे.