आयुषमान खुराणाने विकी डोनर या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने पहिल्याच चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले. त्याने या चित्रपटाच्या यशानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने गेल्या वर्षी तर बधाई हो आणि अंधाधुन सारखे हिट चित्रपट दिले. आयुषमानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याचा आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. त्याच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. आयुषमानमचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात प्रेक्षकांना एका वेगळ्या अंदाजात त्याला पाहायला मिळणार आहे.
आर्टिकल १५ या चित्रपटाद्वारे आयुषमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची नुकतीच घोषणा करण्यात आली. आयुषमाननेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी सांगितले आहे. त्याने ट्वीट करत आर्टिकल १५ हा चित्रपट २८ जूनला प्रदर्शित होणार असल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. आर्टिकल १५ हा इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा असून या चित्रपटात त्याच्यासोबतच इशा तलवार, मनोज पोहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.
आर्टिकल १५ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा करत असून या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एका किस्सा आयुषमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. त्याने ट्वीट करत सांगितले होते की, माझी कामाच्या बाबतीत किती निष्ठा आहे याचीच आज परीक्षा होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आर्टिकल १५ चे आजचे चित्रीकरण अविस्मरणीय होते. आर्टिकल १५ च्या टीममधील सगळ्यांसाठीच आजचा दिवस आव्हानात्मक होता. आम्हाला एका दलदलीत उतरायचे होते. त्या दलदलीत उतरल्यावर आमच्या लक्षात आहे की, यात खूपच किडे आहेत. पण आमच्या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी त्या परिस्थितीत देखील चित्रीकरण चांगल्या प्रकारे पूर्ण केले. त्यामुळे त्यांचे जितके कौतुक करू तितके कठीण आहे. अनुभव सिन्हासाठी आम्ही रक्त वाहायला देखील तयार आहोत.