बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचसारखी कुठलीही गोष्ट नाही, असे अनेक लोक छातीठोकपणे सांगतात. पण जे कास्टिंग काऊचमधून गेले आहेत, त्यांच्या वेदना मात्र वेळोवेळी कानावर येतात. आश्चर्य वाटेल पण आता या यादीत अभिनेता आयुषमान खुराणाचे नावही जोडले गेले आहे. महिलांनाच नाही तर बॉलिवूडमध्ये पुरूषांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो, हे कटू वास्तव त्याच्या अनुभवावरून समोर आले आहे.
तूर्तास आयुषमानची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो कास्टिंग काऊचच्या त्याच्या अनुभवाबद्दल बोलतोय. त्यावेळी आयुषमान टीव्हीवर काम करत होता आणि याचदरम्यान कास्टिंग डायरेक्टरने त्याच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती.
तो सांगतो, ‘ तेव्हा मी टीव्ही अँकर होतो. तेव्हा सोलो टेस्ट व्हायचे. पण अचानक सोलो टेस्ट सुरू असताना तिथे 50 पेक्षा अधिक लोक गोळा व्हायचे. मी याचा विरोध केल्यावर मला हाकलून दिले जायचे. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला मी अनेक नकार पाहिलेत, पचवलेत. एकदा एका कास्टिंग डायरेक्टरने थेट माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती. यावर मी ‘स्ट्रेट’ आहे, असे त्याला शांतपणे सांगून मी तिथून बाहेर पडलो होतो.
त्या काळात मला अनेकांनी नकार दिला. कदाचित सुरुवातीच्या याच नकारांमुळे आज मी यश-अपयश दोन्हीही सहजपणे पचवू शकतो.बॉलिवूडमध्ये दर शुक्रवारी सगळे काही बदलते. पण मी लकी आहे की, गेल्या 2-3 वर्षांपासून प्रत्येक शुक्रवार माझ्यासाठी लकी राहिला आहे, असेही तो म्हणाला.
आयुषमानने 2012 मध्ये विकी डोनर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.