आयुष्मान खुराना हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करुन आयुष्मानने त्याच्या अभिनयाची छाप पाडली. 'ड्रीम गर्ल', 'बधाई हो', 'अंधाधून', 'डॉक्टर जी', 'बाला', 'शुभमंगल सावधान', 'दम लगा के हैशा' असे ब्लॉकबस्टर चित्रपटांतून आयुष्मानने त्याच्या अभिनयाची जादू दाखवली. आयुष्मानचा चाहता वर्गही मोठा आहे. त्याचं सोशल मीडियावरही प्रचंड फॅन फॉलोविंग आहे.
आयुष्मान सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल तो पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असतो. सध्या आयुष्मान चर्चेत आला आहे. एका चाहत्याला त्याने हटके रिप्लाय दिला आहे. आयुष्मानला त्याच्या चाहत्याने परीक्षेत कॉपी करण्यासाठी टिप्स मागितल्या. चाहत्याच्या या मागणीवर आयुष्मानने भन्नाट रिप्लाय दिला आहे.
"सर, माझी १२वी ची बोर्डाची परिक्षा जवळ येत आहे. कृपया, कॉपी करण्यासाठी काही टिप्स द्या", असा मेसेज चाहत्याने केला होता. चाहत्याच्या या अजब मागणीला आयुष्मानने हटके उत्तर दिलं आहे. "कॉपीच्या चिठ्ठ्या इतक्या मनापासून बनवा की चिठ्ठीमध्ये लिहिलेलं सगळं लक्षात राहील," असा रिप्लाय अभिनेत्याने दिला आहे. आयुष्मानने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन ही स्टोरी शेअर केली आहे.
आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित करण्यात झाला. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ड्रीम गर्ल'चा हा सीक्वेल आहे. पण, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फार यश मिळालं नाही. या चित्रपटात आयुष्मानबरोबर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होती.