दूधी भोपळ्याचा रस प्यायलने जाडेपणा, उच्च रक्तदाब, आम्ल पित्त, हृदयरोग यासारख्या आजारावर फायदा होतो, असं आपण ऐकतो. अर्थात याच रसाचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात, जे प्रसंगी जीवघेणेही ठरू शकतात. होय, बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा (Ayushmann Khurrana )याची पत्नी व दिग्दर्शिका ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) हिच्यासोबत काहीसं असंच घडलं. दूधी भोपळ्याचा रस इतका बाधला की, ताहिराला थेट आयसीयूमध्ये भरती करावं लागलं.खुद्द ताहिरा कश्यपने एक व्हिडीओ शेअर करत आपला अनुभव शेअर केला आहे. ताहिराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात कडू दूधी भोपळ्याचा रस प्यायल्यानंतरची तिची झालेली अवस्था तिने सांगितली आहे.
ती या व्हिडीओत म्हणते, ‘फिट राहण्यासाठी मी नेहमी दूधी भोपळा व आवळा व हळदीचा ग्रीन ज्यूस प्यायची. पण त्यादिवशी दूधी भोपळ्याचा रसाची चव काहीशी कडवट होती. तो प्यायला आणि मला उलट्या सुरू झाल्यात. माझा रक्तदाब धोकादायक पद्धतीने कमी झाला. मला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. पण आता मी ठीक आहे.’डॉक्टरांच्या आग्रहास्तव लोकांना जागृत करण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर करत असल्याचेही तिने ठळकपणे नमूद केले आहे.जाणकारांच्या मते, भोपळ्यामध्ये असणाºया क्युकरबिटॅसिन एका विशिष्ट घटकामुळे कधीकधी हा रस प्रमाणापेक्षा जास्त कडू होतो. चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये. अशाप्रकारचा भोपळ्याचा कडू रस प्यायल्यामुळे पोटदुखी, अतिसार, उलट्या, जुलाब यांसारखे त्रास उद्भवतात. अनेकदा असा रस प्यायल्याने काही गंभीर समस्या उद्भवतात. यात जठरामध्ये रक्तस्त्राव होणे, रक्ताच्या उलट्या होणे आणि यकृताशी निगडित तक्रारी उद्भवणे यांचा समावेश असतो.
अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी 11 वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा 16 वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.