2018 मध्ये अंधाधून, बधाई हो यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता आयुष्यमान खुराणा त्याच्या ‘आर्टिकल 15’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण तूर्तास या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला धमकीचे फोन व ई-मेल येत असल्याची बातमी आहे.‘आर्टिकल 15’ ची कथा 2014 मध्ये उत्तरप्रदेशच्या बदायूंमध्ये झालेल्या बलात्कार व हत्येच्या घटनेवर आधारित आहे. या घटनेमध्ये दोन दलित अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून नंतर हत्या केली गेली होती. या घटनेचे जगभर तीव्र पडसाद उमटले होते. मजुरीत केवळ तीन रुपये वाढवून मागणा-या दोन दलित मुलींचा बलात्कार करून हत्या केली जाते, या घटनेवर ‘आर्टिकल 15’आधारलेला आहे.
आयुष्यमान सध्या या चित्रपटाचे आक्रमक प्रमोशन करतोय. याचदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना वेगवेगळ्या लोकांकडून धमकीचे फोन कॉल्स व ई-मेल येत आहेत. चित्रपटाच्या कथानकामुळे या धमक्या दिल्या जात असल्याचे कळतेय.