मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचणाऱ्या बाहुबली चित्रपटाची आणखी एक कथा लवकरच नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. डीजिटल युगात तरुणाईला वेब सिरीजचे याड लागले आहे. त्यातच, सध्या नेटफ्लिक्सवर सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सिरीजने धुमाकूळ घातला आहे. त्यावरुन नेटफ्लिक्सवरील वेब सिरीजला भारतातही मोठा प्रेक्षकवर्ग मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटाची आणखी नवीन एक वेब सिरीज नेटफ्लिक्स या प्रसिद्ध इंटरनेट प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे.
बाहुबली चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक विशिष्ट ओळख आहे. बाहुबली, कटप्पा, शिवगामी हे तीन पात्र विसरणे तर प्रेक्षकांना शक्यच नाहीत. शिवागामीची भूमिका करणाऱ्या राम्याने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली. तर बाहुबलीफेम प्रभासने लाखो तरुणींना घायाळ केले. प्रभासच्या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतूकही झाले. ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले ? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी बाहुबली : द कन्क्लूजन हा दुसरा भाग बाहुबलीच्या चाहत्यांना पाहावा लागला. तर, बाहुबलीचा हा दुसरा भागही प्रचंड लोकप्रिय ठरला. त्यानंतर, आता या बाहुबली चित्रपटाच्या आधीची कथा नेटफ्लिक्सवरुन झळकणार आहे. म्हणजेच, ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटापूर्वीची कहाणी इंटरनेटच्या माध्यमातून चाहत्यांना पाहायला मिळेल.
राजमाता शिवगामीचा एका विद्रोही कन्येपासून ते एक चाणाक्ष्य आणि शूरवीर राणी बनण्यापर्यंतचा प्रवास या वेबसिरीजमधून उलगडण्यात येणार आहे. दिग्दर्शक राजमौली यांच्याकडून माहिष्मती साम्राज्य नेटफ्लिक्सवरुन झळकवण्याची तयारी सुरू आहे. स्वत: राजामौली यांनाही या वेबसिरीजची मोठी उत्सुकता लागली आहे. नेटफ्लिककडून या वेब सिरीजची घोषणा करण्यात आली असून 'द राईज ऑफ शिवगामी' या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज असणार आहे. त्यासाठी राजामौली यांनी आर्का मीडिया वर्क्स आणि नेटफ्लिक्सशी करार केला आहे. दरम्यान, या वेबसिरीजमध्ये कलाकार म्हणून कोण असणार, याबाबत सध्या कोडंचं आहे.