Join us

'बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे', पोलिसांच्या मदतीला धावून आला बबड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 6:42 PM

मुंबई पोलिसांनी बबड्याचा फोटो ट्विट करत तो एक जबाबदार नागरिक असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे मुंबई पोलीस सातत्याने लोकांना गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. मात्र हे आवाहन करत असताना मुंबई पोलिसांनी भन्नाट शक्कल लढवल्या आहेत. मुंबई पोलीस ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सुरक्षेच्या नियमांबद्दल जागरुक करत आहेत. यासाठी अनेकदा ते प्रसिद्ध चित्रपट, डायलॉग, कलाकारांचा वापर करत आहेत. परंतु यावेळी त्यांच्या मदतीला बबड्या धावून आला आहे.

अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील सोहम उर्फ ‘बबड्या’ म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. मालिकेत बबड्याचे पात्र निगेटिव्ह दाखवण्यात आले आहे. यामुळे लोकांना त्याची चीड असून यावरुन अनेक मीम्सही व्हायरल होत असतात. मात्र मुंबई पोलिसांनी बबड्याचा फोटो ट्विट करत तो एक जबाबदार नागरिक असल्याचे म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी बबड्याचा मास्क घातलेला फोटो ट्विट करत म्हटले की, ‘कथानकात ‘ट्विस्ट’ आहे! बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे”. या ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना मास्क वापरत एक जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटला खूप पसंती मिळते आहे.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा आशुतोष हा मुलगा असून अग्गंबाई सासूबाईच्या आधी त्याने काही मालिकांमध्ये काम केले होते. त्याचसोबत त्याचा वन्स मोअर हा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनय हे आशुतोषचं पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॅाटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर यांच्या अ‍ॅकॅडमीमध्ये त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून आशुतोष घराघरात पोहोचला. त्याला या मालिकांमुळे चांगली लोकप्रियता देखील मिळाली.

टॅग्स :अग्गंबाई सासूबाईमुंबई पोलीस