गुन्हेगारांवरील गुन्हे सिद्ध होऊन त्यांच्यावरील त्यांना योग्य ती शिक्षा सुनावली जाते. काही गुन्हेगारांच्या शिक्षा अल्प काळासाठी असतात तर काहींच्या दीर्घकाळासाठी. पण शिक्षा भोगून झाल्यानंतर या गुन्हेगारांचे नेमके काय होते, त्यांना समाजाकडून काय सोसावे लागते, त्यांच्या कुटुंबाचे काय होते, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण त्यावर थोडा फार विचार करून सोडून देण्याखेरीज विशेष असे काही केले जात नाही. पण आता असाच एक विषय दिग्दर्शक आर. विजय आपल्यासमोर मांडणार आहेत ‘बाबांची शाळा’ या चित्रपटातून. लेखिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारीत बाबांची शाळा हा चित्रपट आधारित आहे. जन्मठेप झालेल्या पुरुषाची तुरुंगातली शिक्षा भोगून झाल्यानंतर आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेचे चित्र या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. चित्रपटाची निर्मिती विलास माने, उमेश नथानी यांनी केली आहे. हंसराज पटेल आणि नविन पटेल सहनिर्मित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद पराग कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात सयाजी शिंदे, ऐश्वर्या नारकर, शशांक शेंडे, कमलेश सावंत, थाया कदम, आरती मोरे, उमेश बोलके, मिलींद अधिकारी आदी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
गुन्हेगाराचे शिक्षेनंतरचे आयुष्य दाखवणारी ‘बाबांची शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2016 1:47 AM