बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश 'बाबू' (Babu Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.
बाबू सिनेमाच्या ट्रेलरची सुरूवात दमदार ॲक्शनने होते आणि बाबूचा डॅशिंग अंदाजाही पाहायला मिळतोय. लव्हस्टोरी, दुरावा, शत्रू, बदला आणि ॲक्शनक्शनने परिपूर्ण असा हा ट्रेलर आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, " मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीपणा अनुभवायला मिळणार आहे. ९०च्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नोस्टॅल्जिक करणारी आहे तर तरूणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे. यात प्रेम, मैत्री, दुरावा, शत्रुत्व, बदला, ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे.’’
श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.