बॉलिवूडमध्ये सध्या गुडन्यूजची लाट आली आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी गुडन्यूज देत आहेत. नुकतंच अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) बाबा झाला आहे. पत्नी नताशा दलालने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाबा झाल्यानंतर वरुण धवनने सोशल मीडिया पोस्ट केली आहे. धवन कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. सगळेच 'बेबी गर्ल'ला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चाहत्यांनीही वरुण धवन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेता वरुण धवन काल हिंदुजा रुग्णालयाबाहेर दिसला होता. त्यामुळे कधीही गुडन्यूज मिळेल असा अंदाज होता. काल (3 जून) रोजी रात्री नताशा दलालने मुलीला जन्म दिला. यानंतर वरुणची वहिनी आणि आई आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी सर्वांना आपण आजोबा झाल्याची बातमी दिली. कन्यारत्न प्राप्त वरुण आणि नताशा दोघंही सध्या आनंद साजरा करत आहेत. वरुण धवनने एक अॅनिमिटेड व्हिडिओ शेअर करत लिहिले, "our baby girl is here. आई आणि बाळासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हरे राम हरे कृष्ण!'
वरुण धवनच्या या पोस्टवर सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. 'खूप चांगली बातमी' अशी कमेंट समंथा रुथ प्रभूने केली आहे. बेबी धवनचं घरी जंगी स्वागत करण्यात येणार आहे. लग्नानंतर ३ वर्षांनी वरुण आणि नताशा आईबाबा झाले आहेत. शाळेपासूनची मैत्री, मग प्रेम आणि आता त्यांच्या प्रेमाचा प्रवास आता आईबाबा होण्यापर्यंत पोहोचला आहे.
यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक कपल्सने गुडन्यूज दिली. काही दिवसांपूर्वीच यामी गौतमने मुलाला जन्म दिला. तर रिचा चड्डाही येत्या काही महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. शिवाय सर्वांची लाडकी जोडी रणवीर सिंह-दीपिका पदुकोणही या वर्षी सप्टेंबर महिन्यात आई बाबा होणार आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.