बेताची परिस्थिती आणि घरच्यांचा विरोध, अशी आहे प्रवीण तरडे आणि स्नेहल यांच्या लग्नाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 06:00 AM2023-05-07T06:00:00+5:302023-05-07T06:00:00+5:30
Pravin Tarde : प्रवीण तरडे यांच्या यशस्वी कारकीर्द घडण्यामध्ये स्नेहल तरडे यांचा मोलाचा वाटा आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतला रांगडा गडी म्हणजे लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे. एकामागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे हे आज मराठी इंडस्ट्रीमधील एक ब्रँड बनले आहेत. मात्र प्रसिद्धीचा शिखरावर असणाऱ्या प्रवीण तरडे यांच्या यशामागे आहे गेल्या २५ वर्षांचा कठीण काळ. प्रवीण यांचा कारकीर्द घडण्यामध्ये स्नेहल तरडे यांचा मोठा वाटाच नाही तर एक उत्तम अभिनेत्री म्हणून केलेला त्याग देखील आहे. चला तर जाणून घेऊया प्रवीण तरडे स्नेहल तरडे यांची प्रेरणादायी लव स्टोरी.
हा २००४ चा आसपासचा काळ होता एमबीए पर्यंत शिक्षण घेतलेलं प्रवीण तरडे यांनी नोकरी सोडून एकांकिका आणि प्रयोगीकी नाटकांची आवड जोपासायचे ठरवलं, यासाठी प्रवीण यांनी स्वतःच घर देखील सोडले होते. नोकरी नसल्याने जवळपास पैसेही नसायचे,अशावेळी प्रवीण मित्रांकडून पैसे घेऊन गावखेड्यात जाऊन कलाकार शोधून गावाचा चावडीवर नाटकांचे खेळ चालवायचे. असाच एकदा पुण्याजवळ नाटक बसवायला गेलेल्या प्रवीण याना स्त्री पात्राची गरज होती, मात्र गावखेड्यात स्त्री कलाकार मिळणे प्रवीण कठीण जात होते, अशावेळी प्रवीण याना पुण्यात जाऊन अभिनेत्रींचा शोध घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी स्नेहल पुण्यामध्ये एकांकिकांनामध्ये अभिनय करत होत्या आणि यादरम्यान त्या अल्फा करंडक एकांकिका स्पर्धेसाठी तयारी करत होत्या. त्यावेळी एका व्यक्तीने प्रवीण यांना स्नेहल यांचे नाव सुचवले. त्या काळात पुरुषोत्तम सारख्या स्पर्धा गाजवणाऱ्या प्रवीण तरडे पुण्यातील रंगभूमीवरील मोठे नाव होते. म्हणून स्नेहल यांनीदेखील प्रवीण यांच्यासोबत काम करण्यास होकार दिला.
दोघांमध्ये प्रेमाची पालवी फुटू लागली होती...
गावोगावी नाटकांचे प्रयोग करताना असल्याने स्नेहल यांना प्रवीण यांच्यासोबत बाईकने प्रवास करावा लागायचा. याच दरम्यान त्यांच्यामध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. ते जास्त काळ एकमेकांसोबत घालवू लागले होते. मात्र नाटकांसाठी कलेसाठी प्रवीण यांची असलेली तळमळ आणि झिंग पाहून स्नेहल हळूहळू त्यांचा प्रेमात पडू लागल्या होत्या, मात्र हे प्रेम एकतर्फी नव्हते. प्रवीण यांचा मनात देखील स्नेहलबददल प्रेमाची पालवी फुटू लागली होती. असे असले तरी त्यांनी कधीच एकमेकांना प्रेमाची कबुली दिली नाही. मात्र एक दिवस प्रवीण यांनी त्यांचा वाढदिवसाचा निमित्ताने आपल्या भावना स्नेहल समोर उघड करत लग्नाची मागणी घातली. स्नेहल यांनी देखील आनंदात होकारही दिला.
स्नेहल यांच्या कुटुंबातून झाला लग्नाला विरोध
मात्र जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा समोर एक अडचण होतीच ती म्हणजे पैसे. प्रवीण करत असलेलया प्रायोगिक नाटकांमधून त्यांची नाटक करण्याची हौस जरी भागत असली त्यातून घर चालावं इतकं पैसे काही येत नव्हते. होणाऱ्या जावयाकडे नोकरी नाही स्वतःच घर नाही त्यात वयात १२ वर्षाचं अंतर हे पाहून स्नेहल यांचा कुटुंबियांकडून प्रचंड विरोध झाला, मात्र स्नेहल यांनी हार मानली, प्रविनवर त्यांनी पूर्ण निष्ठा आणि विश्वास ठेवला. एक मुलगी आपल्यावर जीवापाड प्रेम करते, आपल्या घरातल्यांचा विरोधात जाऊन आपल्याशी लग्न करते या विचाराने प्रवीण अस्वस्थ झाले. त्यांनी प्रायोगिक नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस प्रवीण यांनी स्नेहल यांना तुझ्या आईला मी मालिकांचे लेखन करतो असे सांगायला सांगितलं, मात्र स्नेहल यांनी आईला खोटे कसे सांगायचं हे विचारल्यावर, माझे मुंबईत चांगले मित्र आहेत. त्यांना सांगून मी मलिकाच्या लेखनाचे काम मिळवेन असे प्रवीण यांनी सांगितले. त्यानंतर प्रवीण यांनी मुंबईला त्यांचा जुना मित्र आणि अभिनेता चिन्मय मांडलेकरला फोन करत केवळ काहीतरी काम देण्याची विनंती केली. चिन्मयने काम मिळेल पण क्रेडिट्समध्ये तुझे नाव देता येणार नाही असे सांगितले. प्रवीण ही तडजोड करत अग्निहोत्र आणि असंभव या त्यांचा मालिकांचे लेखन सुरु केले. अखेर स्नेहल यांनी प्रवीण यांनी २ डिसेंबर २०१० रोजी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
संसार सुरु झाला पण...
संसार सुरु झाला असला तरी स्नेहल आणि प्रवीण यांचा प्रवास तितका सोपा नव्हता, तुटपुंजे पैसे आणि भाड्याचा घरात संसार चालवणे कठीण जात होत. असे असतानाही स्नेहल प्रवीण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. वयाचा २२-२३ व्या वर्षी चांगल्या भूमिका मिळत असतानाही स्नेहल यांनी करियरला ब्रेक लावत मुलाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. एका पडक्या भाड्याचा घरात आपल्यासोबत संसार करणाऱ्या पत्नीचं प्रेम आणि त्याग पाहून प्रवीण यांनी स्नेहलची सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा जणू चंगच बांधला. प्रवीण यांनी लेखनासोबत अभिनय ,सहायक दिग्दर्शन यासारखे मिळेल ते काम करण्याचा निर्णय घेतला. पुढील ७ वर्ष सतत १८- १८ तास काम करत इंडस्ट्रीमध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण केले आणि या ७ वर्षात लग्नाचा प्रत्येक वाढदिवशी एक फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला. आपल्या जोडीदाराकडे काहीही नसताना त्याचा खंबीरपणे उभी राहणाऱ्या स्नेहल आणि आपल्या पत्नीचा त्यागाची जाणीव ठेवत दिवस- रात्र एक करून तिची सगळी स्वप्न पूर्ण करणाऱ्या प्रवीण यांची प्रेमाची खरोखर आजचा काळात दुर्मिळ आणि प्रेरणा देणारी आहे.
थोडे बहुत पैसे जरी येत असले तरी क्रेडिट्समध्ये नाव येत नाही. स्नेहल यांच्या आईवडिलांचा विश्वास बसत नाही असे सांगत प्रवीण यांनी पुन्हा चिन्मयकडे क्रेडीटसाठी नाव द्यायचा तगादा लावला. अखेर चिन्मय प्रवीण यांचे लेखक म्हणून नाव देण्यासाठी तयार झाले. कुंकू ही प्रवीण तरडे यांची लेखक म्हणून नाव असलेली पहिली मलिका ठरली. काम मिळाले असले तरी घराचा प्रश्न हा होताच. अखेर प्रवीण आणि स्नेहल लग्नगाठ बांधत सुखी संसाराची सुरुवात केली.