प्रभुदेवा साऊथ इंडस्ट्रीतील मोठे नाव. डान्सच्या जोरावर प्रभुदेवा फिल्म इंडस्ट्रीत आला. नंतर अभिनेता बनला आणि पुढे दिग्दर्शकही बनला. अभिनेता, कोरिओग्राफर, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकेत वावरणारा प्रभूदेवा आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. होय, आत्तापर्यंत स्वत: नाचणारा आणि बड्या बड्यांना नाचवणारा प्रभुदेवा आता प्रेक्षकांना घाबरवणार आहे. प्रभुदेवाच्या ‘बघीरा’ या तामिळ चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर आम्ही काय म्हणतोय, ते तुमच्या लक्षात येईल.
या टिजरमध्ये प्रभुदेवाचे एक भयावह रूप पाहायला मिळत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याने या चित्रपटाचा टीजर रिलीज केला आहे. यात प्रभुदेवा कधी नव्हे अशा रूपात दिसतो आहे. टीजर एकदम शानदार आहे.
या मिस्ट्री थ्रीलर सिनेमात प्रभुदेवा सायको किलरच्या भूमिकेत आहे. त्याचे वेगवेगळे लूक्स टीजरमध्ये दिसत आहेत. काही लूक्समध्ये तर प्रेक्षक प्रभुदेवाला ओळखूही शकणार नाहीत. डान्स व कॉमेडी रोलमध्ये दिसणा-या प्रभुदेवाला या रूपात, इतक्या जबरदस्त अवतारात पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे एक पर्वणी असणार आहे.
या सिनेमात त्याच्यासोबत अमायरा दस्तूर लीड रोलमध्ये आहे. अदविक रविचंद्रन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘बघीरा’ हा प्रभुदेवाचा 55 वा सिनेमा आहे. याआधी तो बॉलिवूडच्या ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ या सिनेमात दिसला होता.
‘भारताचा मायकल जॅक्सन’ म्हणून ओळखल्या जाणा-या प्रभुदेवाने अभिनेता म्हणून तो ओळख निर्माण करू शकला नाही. पण आपल्या नृत्याने त्याने भारतातील कोट्यवधी नृत्यवेड्यांना जणू वेड लावले. प्रभुदेवाचे दोन्ही भाऊ राजू सुंदरम आणि नागेन्द्र प्रसाद दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. खरे तर प्रभुदेवाला अॅक्टर व्हायचे होते.
प्रभुदेवाने आपले करिअर एक डान्सर आणि अभिनेता म्हणून सुरू केले. मात्र अभिनयात त्याला फार यश गाठता आले नाही. प्रभुदेवाने आपल्या करिअरची सुरुवात डान्स कोरिओग्राफर म्हणून केली होती. मात्र नंतर त्याला अभिनय खुणावू लागला. यानंतर 1994 मध्ये प्रभुदेवाने ‘इंदू’ नामक सिनेमा केला. या चित्रपटात त्याच्या अपोझिट दिसली होती ती अभिनेत्री रोजा. प्रभुदेवाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी अशा अनेक चित्रपटांत काम केले. शिवाय 100 पेक्षा अधिक चित्रपटांत नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले. नृत्यदिग्दर्शनासाठी प्रभुदेवाला दोनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.