'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतोय. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन आठवड्याच दमदार कमाई करत तिसऱ्या आठवड्यातही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील आपली पकड कायम ठेवली. मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंच्या या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. या मराठी सिनेमानं आता तब्बल ५० कोटींच्या पुढं कमाई केली आहे.
बाईपणाची भारी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली. एकाच दिवशी ६.१० कोटींची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट हा रेकॉर्डही बाईपण भारी देवा चित्रपटाने नावावर केला आहे. दुसऱ्या आठवड्यापर्यंत सिनेमानं ३७.३५ कोटींची कमाई केली होती. आता तिसऱ्या आठवड्यातला कमाईचा आकडा समोर आला आहे.
या सिनेमानं तब्बल ५० कोटींचा टप्पा पार केला आहे.‘सॅकनिल्क’नं दिलेल्या आकड्यांनुसार रविवारी या सिनेमानं ५ कोटींची कमाई केली आहे. तर आत्तापर्यंतची कमाई ही ५४ कोटी झाली आहे. त्यामुळे आता 'बाईपण भारी देवा' आणखी कोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
बहुचर्चित 'बाईपण भारी देवा' चित्रपटात काकडे सिस्टर्स या सहा बहिणींची अनोखी गोष्ट दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात सुकन्या मोने, रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, दीपा परब, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत.
आता हा सिनेमा नागराज मंजुळे यांच्या सैराट आणि रितेश देशमुखच्या वेडचा रेकॉर्ड तोडणार का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. 'सैराट'ने ८५ कोटींची कमाई केली होती तर 'वेड'नं ७५ कोटींची कमाई केली होती