अभिनेता आयुषमान खुराना बॅक टू बॅक दोन चित्रपटात झळकणार आहे त्यातील एक म्हणजे ड्रीम गर्ल आणि दुसरा बाला. आयुषमानच्या ड्रीम गर्ल चित्रपटाचा ट्रेलर व गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. आता त्याच्या दुसऱ्या आगामी चित्रपट बालाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
आयुषमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाला चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. ड्रीम गर्ल सारखा आयुषमानने बाला सिनेमातील लूकनेदेखील सर्वांना चकीत केलं आहे.
टीझरमध्ये आयुषमानचं टक्कल पडलेलं दिसत आहे. तो मोटर सायकलवर स्टाईल मारत शाहरूख खानच्या ‘कोई ना कोई चाहिए प्यार करन वाला’ हे गाणं गुणगुणताना दिसतो आहे. मात्र त्याचदरम्यान वाऱ्याचा झोत येतो आणि त्याची डोक्यावरील टोपी उडून जाते. त्यानंतर त्याचं टक्कल दिसू लागतं आणि तोदेखील नरमून जाताना दिसतो आहे. निराश झालेला आयुषमान राजेश खन्ना यांचं ‘रहने दो छोड़ो भी जाने दो यार’ हे गाणे गाताना दिसतो आहे. ५७ सेकंदांचा बालाचा टीझर खूपच मजेशीर आहे. टीझर पाहून त्याचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत.
बाला चित्रपटात आयुषमान खुराणासोबत भूमी पेडणेकर व यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन 'स्त्री' फेम अमर कौशिक करणार आहेत आणि हा चित्रपट टकलेपणावर आधारीत आहे.
आयुषमानसोबत 'बाला' चित्रपटात काम करण्याबाबत भूमी पेडणेकर म्हणाली की, 'अमर, आयुषमान व माझी विचार करण्याची पद्धत सारखीच आहे. त्यामुळे आम्ही तिघे मिळून जे काही करू ते चांगलेच असेल. अमरला काय हवे हे माहित आहे. त्यामुळे तो त्याच्या चित्रपटातील पात्र वास्तविक वाटण्यासाठी खूप मेहनत घेतो.'