'इंडियन आयडॉल' (Indian Idol) या शोमधून घराघरात लोकप्रिय झालेला गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)मध्ये पाहायला मिळतो आहे. या शोमध्ये सहभागी झाल्यापासून गायक सतत चर्चेत येतो आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अभिजीत सावंतने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने करिअरपासून अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला होता. यावेळी त्याने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) यांचा एक किस्सादेखील सांगितला.
अभिजीत सावंत याने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला की, मी मातोश्रीवर गेलो होतो. बाळासाहेबांनी मला घरी बोलवलं होतं. त्यांना कलाकारांप्रती खूप प्रेम आणि आवड होती. त्यांच्या घरातील वरच्या माळ्यावर आम्ही सगळे बसलो होतो. त्यावेळी त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याचे उपदेश दिले. माझ्या पूर्ण फॅमिलीला बोलवलं होतं. संपूर्ण ठाकरे कुटुंबाला माझ्यासमोर उभं केलं होतं आणि आमची ओळख करून दिली. आम्ही ज्यांना मत द्यायचो. ज्यांना तारणहार समजायचो. संपूर्ण महाराष्ट्राचं भलं करणारे आणि आमच्या आवडीचे नेते ओळख करून देत होते. हा एक वेगळाच अनुभव होता.
"मी शिवसेनेत प्रवेश केलेला पण नंतर..."या मुलाखतीत अभिजीत सावंतने शिवसेनेत प्रवेश करणार होतो, असे सांगितले. तो म्हणाला की, मी शिवसेनेत प्रवेश केला होता. मला ते सर्व लोक आवडायचे. खास करून आदित्य ठाकरे. त्यावेळेला तो समविचारी माणूस वाटायचा. कारण ते तरूण होते. कविता करायचा. त्यांना कलेची जाण आहे. त्यांच्यासोबत बसल्यावर कळायचं की ते एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. लहान आहे पण खूप ज्ञान आहे. बोलणं खूप मॅच्युअर आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत मजा यायची. महत्त्वाची गोष्ट ही होती की, मी धारावीत राहायचो. संपूर्ण आयुष्य तिथे काढले. तिथल्या समस्या जवळून पाहिल्या होत्या. म्हणून मला वाटायचे की ज्या लोकांनी इतकं प्रेम दिले आणि माझ्यासाठी एवढं सगळं केलंय, त्यांच्यासाठी मी पण काही चांगलं करू शकलो तर समाधान मिळेल. पण नंतर मला कळलं समाजसेवेपेक्षा इथे जास्त राजकारण असते. त्यामुळे आपला कामधंदा बरा आहे असे वाटले. म्हणून मी राजकारणातून बाहेर पडलो. मी खूप चांगल्या लोकांना भेटलो. त्यांच्याकडून खूप काही शिकलो. वाईट लोकांकडूनही चांगल्या गोष्टी शिकलो. त्यामुळे शिकत राहण्याचा प्रयत्न करत राहिलो.