स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेनं सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni). सध्या सगळीकडे गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. तसेच यंदा गौरी कुलकर्णीच्या मुंबईतील घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत. खुद्द तिनेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दल सांगितले.
अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, सणासुदीला घराची, घरच्यांची , नातेवाईकांची, बीडची तीव्रतेने आठवण येते. सततच्या शूटींग मुळे बीडला जाणं होत नाही. त्यामुळे यावेळेस प्रथमच मी माझ्या मुंबईच्या घरात गणपती बसवायचा ठरवलं आणि बाप्पा माझ्या घरी आला. नुसताच आला नाही तर गावाकडच्या आठवणी, गावाकडची लोकं व त्यांची उबदार माया आणि जिव्हाळा घेऊन आला. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय!!! गणपती बाप्पा मोरया!!!
गौरी कुलकर्णीच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची मूर्ती अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आणि मयुरेश लोटलीकर यांनी बनवली आहे, तर पूजेची तयारी जिनल आणि संदेश पवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे ही इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती आहे. दरम्यान गौरी कुलकर्णी सध्या ‘सन मराठी’वर ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत दिसत आहे. यात ती शर्वरी हे पात्र साकारत आहे.