Bappi Lahiri Gold Collection : ‘डिस्को किंग’ नावाने लोकप्रिय झालेले बप्पी दा अर्थात गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri )आज आपल्यात नाहीत. 15 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचं निधन झालं. बप्पी दा यांचं सोन्याच्या दागिन्यांवरचं प्रेम सर्वांनाच ठाऊक होतं. सोन्याचे दागिने घालण्याची त्यांना प्रचंड आवड होती. गळ्यात सोन्याच्या जाड साखळ्या, हातात कडे, पाचही बोटांत अंगठ्या ते परिधान करायचे. बप्पी दा यांच्याकडे 1 किलोहून अधिक सोनं होतं असं म्हणतात. बप्पी दा यांच्या मृत्यूनंतर या सोन्याचं काय होणार? ते कोणाला मिळणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात असणार. आता त्यांच्या मुलानं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
बप्पी लहरी यांचा मुलगा बप्पा लहरी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत वडिलांबद्दल भरभरून बोलला. माझ्या वडिलांसाठी सोनं घालणं हा फॅशनचा भाग नव्हता. तर सोनं त्यांच्यासाठी लकी होतं. सोन्यात त्यांचा आध्यात्मिक रूची होती. म्हणूनच अगदी व्हॅटिकन सिटीपासून हॉलिवूडपर्यंतच्या जगभरातील प्रत्येक भागातून त्यांनी सोनं गोळा केलं. त्यांनी त्यांच्या आवडीनुसार, सर्व ठिकाणचं सोनं गोळा करून त्याचे दागिने घातले. अगदी पहाटे 5 वाजताची फ्लाईट असली तरी ते दागिने घालत. त्यांनी दागिन्यांशिवाय कधीही प्रवास केला नाही, असं त्याने सांगितलं.
बप्पी दा यांच्या सोन्याचं काय करणार? सोनं म्हणजे बाबांची शक्ती होती. या धातूशी त्यांचा आध्यात्मिक संबंध होता. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोन्याच्या सर्व वस्तू, दागिने जपून ठेवणार आहोत. सोनं ही त्यांची सर्वात आवडती गोष्ट होती. लोकांनी त्यांच्या वस्तू पाहाव्यात अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही त्या संग्रहालयात ठेवू. त्यांच्याकडे शूज, सनग्लासेस, टोपी, घड्याळं आणि दागिन्यांचं कलेक्शन होतं, ते त्यांच्या चाहत्यांना पाहता यावं म्हणून त्याचं प्रदर्शन भरवू, असंही तो म्हणाला.
हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा बप्पी दा यांचा आवडता कलाकार होता. तो कायम गळ्यात सोनसाखळी घालायचा. त्याला पाहून बप्पी दा यांनीही गळ्यात सोन्याची चेन घालणं सुरू केलं. सोनं आपल्यासाठी लकी आहे, हे जाणवल्यानंतर त्यांनी कायम सोन्याचे दागिने घालणं सुरू केलं.