मुंबई: ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. लता दीदी गेल्यानंतर अवघ्या दहा दिवसांनंतर बप्पीदा यांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे संगीत क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीतून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. बप्पीदा यांचा पुत्र अमेरिकेहून येताच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र, यातच बप्पीदा यांच्या जावयाने त्या दिवशी रात्री नेमके काय घडले, तो प्रसंग शेअर केला आहे.
बप्पी लाहिरी यांची कन्या रिमा लाहिरी यांचे पती गोविंद यांनी बप्पीदा गेले त्या रात्री नेमके काय घडले, याबाबतचा प्रसंग शेअर केला. आताच्या घडीला आमचे संपूर्ण कुटुंब शोकमग्न आहे. कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का आहे. बप्पीदा यांची तब्येत अचानक बिघडली आणि यातच त्यांचे निधन झाले, असे गोविंद यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी ठणठणीत होऊन घरी परतले होते
बप्पी लाहिरी यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बप्पीदांनी उपचारांना उत्तम प्रतिसादही दिला. तीन आठवड्यांच्या यशस्वी उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. यानंतर मंगळवारी, १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान त्यांनी व्यवस्थित जेवण केले. मात्र, जेवण झाल्यावर अगदी अर्धा ते पाऊण तासांत त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला. तत्काळ त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली, असे गोविंद यांनी सांगितले.
दरम्यान, वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्याला तबल्याची साथ करून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. ८० च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळे त्यांना डिस्को किंग असे म्हटले जात होते. बप्पीदा यांनी ९० हिंदी आणि ४० अन्य भाषांमधील चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. तत्कालीन सर्वात लोकप्रिय संगीतकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली. १९८३ ते ८५ या दोन वर्षांत त्यांनी संगीतबद्ध केलेल्या १२ चित्रपटांनी चित्रगृहांमध्ये रौप्य महोत्सव साजरे केले. १९८६ मध्ये ३३ चित्रपटांसाठी १८० गीते स्वरबद्ध करण्याचा त्यांचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदला गेला.