Join us  

येत्या जूनमध्ये प्रदर्शित होणार बरड

By admin | Published: May 07, 2016 4:28 AM

नापीक बरड असलेल्या जमिनीला रातोरात फैलावलेल्या एका अफवेमुळे सोन्याचा भाव येण्याची स्वप्ने कशी रंगविली जातात आणि त्यामुळे एका अख्ख्या जिल्ह्याचे समाजस्वास्थ्य

नापीक बरड असलेल्या जमिनीला रातोरात फैलावलेल्या एका अफवेमुळे सोन्याचा भाव येण्याची स्वप्ने कशी रंगविली जातात आणि त्यामुळे एका अख्ख्या जिल्ह्याचे समाजस्वास्थ्य कसे उद्ध्वस्त होते, याची अत्यंत रंजक राजकीय कहाणी उलगडत नेणारा ‘बरड’ येत्या जूनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रेती’ या अत्यंत स्फोटक विषयावरील चित्रपटाच्या दणदणीत यशानंतर निर्माते प्रमोद गोरे हा चित्रपट घेऊन येत आहेत. तर, तानाजी घाडगे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुहास पळशीकर यांच्या मध्यवर्ती भूमिकेसह शहाजी काळे, राजन पाटील, भारत गणेशपुरे, नंदकिशोर चौगुले या कलाकारांनी यामध्ये भूमिका साकारून चित्रपट जिवंत केला आहे. ‘जिथे काहीच पिकत नाही तिथे अफवा पिकते’ या म्हणीचा अस्सल प्रत्यय या सिनेमातून येतो. वेगवान अफवांचा अन् घटनांचा हा खेळ सरपंच-आमदारांपासून उद्योगमंत्र्यांपर्यंत राजकीय नियम धाब्यावर बसवून खेळला जातो; आणि एका वैश्विक सत्याला हा चित्रपट भिडतो. गावपातळीपासून जिल्ह्यापर्यंतच्या बेरक्या राजकारणाचे बारकावे, अस्सल दर्शन कथा, पटकथा आणि संवादलेखन करीत अतिशय प्रभावीपणे लेखक देवेन कापडणीस यांनी घडवले आहे. अस्सल ग्रामीण बाज असलेली कथा अन् तिचा असलेला मानवी स्वार्थाचा केंद्रबिंदू यातून बरडचे कथानक पुढे सरकते. देशभरात जमिनीसाठी होत असलेले अभद्र व्यवहार आणि भूखंडाच्या वादासाठी राजकारणी आणि गुंडांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी या वास्तवाची बिनधास्त चिरफाड बरडमध्ये केली आहे.