अभिनेत्री नम्रता आवटे-संभेराव (Namrata Awate-Sambherao) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नम्रताला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या शोमधून तिचा फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप वाढला आहे. ती सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आज तिचा नवरा योगेश संभेराव याचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने तिने पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री नम्रता संभेरावने पतीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी बर्थडे योग्स. तू जो है साथ तो ये अंबर लगे कि जैसे साया हो सर पर, तेरे काँधे पर रखकर सर यूँ ही कट जाए सारी उमर. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत. आयुष्यभर असाच रुबाबदार रहा हसत रहा सोबत रहा खुश रहा. आय लव्ह यू. नम्रताच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असून तेदेखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
नम्रता आवटे-संभेरावने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोव्यतिरिक्त 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. तिचे 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. तसेच तिचा काही महिन्यांपूर्वी नाच गं घुमा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यात तिने साकारलेली आशा ताईची भूमिका प्रेक्षकांचा खूपच भावली.