Join us  

सैनिक हो तुमच्यासाठी!

By admin | Published: August 12, 2016 2:05 AM

निधड्या छातीने सीमेवर शत्रूंच्या तोफांना सामोरे जाणाऱ्या अनेक जवानांच्या कुटुंबांना त्यांच्या मृत्यूनंतर अनेकदा उपेक्षेचे जीवन जगावे लागते.

निधड्या छातीने सीमेवर शत्रूंच्या तोफांना सामोरे जाणाऱ्या अनेक जवानांच्या कुटुंबांना त्यांच्या मृत्यूनंतर अनेकदा उपेक्षेचे जीवन जगावे लागते. काहींना तर रोजच्या गरजा भागवण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागतो. अशा कुटुंबांच्या वेदनांनी संवेदनशील कलावंतांचे मन नाही गहिवरले तरच नवल. असेच काहीसे ‘एक दिन तेरी राहों मे..’ आणि ‘जश्ने बहारा’ या गाण्यांनी संगीतप्रेमींना वेड लावणारा प्रसिद्ध पार्श्वगायक जावेद अलीच्याबाबतीतही घडले आहे. म्हणूनच त्याने आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐकून आपल्या संगीताद्वारे शहिदांच्या विधवांना मदतीचा हात देण्याचा संकल्प केला आहे. ‘टेन डायमेन्शन’ आणि ‘वसंत रत्न’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जय है’ सूर मैफिलीत जावेद अली आपल्या सुरांची बरसात करणार आहे. या कार्यक्रमातून मिळणारा निधी शहिदांच्या विधवांसाठी खर्च करण्यात येणार आहे. आज नेहरू सेंटर येथे ही जावेद अलींच्या सुरांची मैफल रंगणार आहे. ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना खुद्द जावेद अलीने ही माहिती दिली. तो सांगतो, ‘देशाच्या रक्षणासाठी प्राणांचे मोल देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबांसाठी मला काहीतरी करता येतेय, हे माझे सौभाग्यच आहे असे मी मानतो. ‘जय हे’या इव्हेंटच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली आहे. या कार्यक्रमातून येणारा निधी शहिदांच्या विधवांसाठी खर्च होणार आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे. जेणेकरून शहिदांच्या कुटुंबांसाठी यातून एक मोठा निधी उभारला जाऊ शकेल, असे आवाहन मी करेल. या कार्यक्रमाला योगदान देण्याचा प्रस्ताव माझ्याकडे आला आणि मी तो लगेचच स्वीकारला. या निमित्ताने समाजासाठी खारीचा का होईना वाटा मला उचलता येईल, याचा मला आनंद आहे.’