ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - काही कलाकार मोजक्याच भूमिका साकारतात, पण त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा अजरामर होतात. असे कलाकार त्या भूमिकेत असा काही जीव ओततात की, त्या केवळ पडद्यावरच नव्हे, तर रसिकांच्या मनातही चिरकाल सजीव होतात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी या ओळखीपेक्षा 'आत्मविश्वास' या चित्रपटाद्वारे एक सशक्त अभिनेत्रीच्या रूपात समोर आलेल्या निलकांती पाटेकर या देखील याच तोलामोलाच्या अभिनेत्री आहेत. 'आत्मविश्वास' या चित्रपटानंतर एकाही चित्रपटात न दिसलेल्या निलकांती पाटेकर तब्बल २८ वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. निलकांती यांना पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं श्रेय निर्मात्या-दिग्दर्शिका निलीमा लोणारी यांना जातं. त्यांच्या 'बर्नी' या आगामी चित्रपटात निलकांती एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्य पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या 'चिनु' या बहुचर्चित चित्रपटानंतर निलीमा लोणारी पुन्हा एकदा 'बर्नी'द्वारे स्त्रीप्रधान विषय घेऊन येत आहेत. प्रा. सुभाष भेंडे यांच्या 'जोगीण' या कादंबरीवरून प्रेरित होऊन बनवण्यात आलेल्या या चित्रपटाची निर्मिती शिवम लोणारी यांनी केली आहे. निलकांती पाटेकर यांनी या चित्रपटात पुन्हा एकदा आईची भूमिका साकारली असली, तरी 'आत्मविश्वास'मधील आईपेक्षा ही आई खूप वेगळी आहे. या भूमिकेबाबत निलकांती पाटेकर म्हणाल्या, ''प्रा. सुभाष भेंडे यांची 'जोगीण' ही कादंबरी फार पूर्वीच माझ्या वाचनात आली होती. ही कादंबरी वाचल्यावर यावर एक सिनेमा बनायला हवा, असं वाटलं होतं. कोणीतरी या कादंबरीवर सिनेमा बनवावा आणि आपल्याला त्यात बर्नीची भूमिका द्यावी असं वाटत होतं, पण कोणीही तसं धाडस केलं नाही. निलीमा लोणारी यांनी 'बर्नी' या चित्रपटात ते धाडस केलं आहे. निलीमा यांनी जेव्हा हा चित्रपट बनवायला घेतला, तेव्हा त्यांनी मला या चित्रपटात बर्नीची आई क्लाराची भूमिका साकारण्याबाबत विचारणा केली. मला कादंबरी आवडली होतीच त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. काळानुरुप आता मी बर्नी नव्हे, तर तिची आई साकारू शकते हे सत्यही मला पटलं होतं. 'आत्मविश्वास'मध्ये आईची भूमिका साकारल्यानंतर त्याच बाजाच्या भूमिकांच्या ऑफर्स येत होत्या. त्या मला करायच्या नव्हत्या. त्यामुळे थांबले होते. 'बर्नी'मध्ये काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाल्याने पुन्हा चित्रपटांकडे वळले आहे.''
'आत्मविश्वास'नंतर जवळजवळ २८ वर्षे पडद्यामागे राहिलेल्या निलकांती यांना बर्नीच्या आईच्या भूमिकेसाठी निवडण्याबाबत सांगताना निलीमा लोणारी म्हणाल्या, ''निलकांती आणि माझं नाशिक कनेक्शन आहे. नाशिकच्या असल्याने मी त्यांना ओळखते. त्यांना भेटल्यावर एक चांगली अभिनेत्री असूनही या चित्रपटात अभिनय का करत नाहीत? हा प्रश्न वारंवार मनात यायचा. त्यांच्याशी बोलल्यानंतर एकाच पठडीतील भूमिका त्यांना साकारायच्या नसल्याचं समजलं. या दरम्यान 'जोगीण' ही कादंबरी माझ्या वाचनात आली. कादंबरी वाचत असताना त्यावर सिनेमा बनवायचा विचार आला. सिनेमासाठी कथाविस्तार करताना बर्नीच्या आईच्या भूमिकेसाठी निलकांती यांना घेण्याचा विचार मनात आला. त्यांना याबाबत विचारलं तेव्हा त्यांचं या कादंबरीशी फार जुनं नातं असल्याचं समजलं. त्यांनी ही कादंबरी वाचलेली होती आणि त्यावर कुणीतरी सिनेमा बनवायला हवा असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे बर्नीच्या आईच्या भूमिकेसाठी विचारल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. त्यांचं जनरल नॉलेज अफाट आहे. त्याचा फायदा आम्हाला चित्रपट बनवताना झाला.''
तेजस्वीनी लोणारीने या चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली असून राजन ताम्हाणे, भूषण पाटील, गिरीश परदेशी, सविता मालपेकर, किरण खोजे, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर, चैत्राली डोंगरे, राज हंचनालळे, राधिका देशपांडे या मराठीतील आघाडीच्या कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. १७ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.