‘भाभी जी घर पर है’फेम सौम्या टंडनच्या हेअर ड्रेसरला कोरोनाची लागण, सेटवर भीतीचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:59 PM2020-07-08T12:59:35+5:302020-07-08T13:00:09+5:30
सौम्याची पर्सनल हेअर ड्रेसर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवर खळबळ उडाली.
कोरोना व्हायरसचा कहर वाढत असताना आता ‘भाभी जी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेत अनीता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन हिची पर्सनल हेअर ड्रेसर कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. यानंतर सौम्याला काही दिवस शूटींग न करण्यास सांगण्यात आले आहे.
टेली चक्करने याबाबतचे वृत्त दिले आहे. सौम्याची पर्सनल हेअर ड्रेसर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवर खळबळ उडाली. शोचे निर्माते तातडीने सेटवर पोहोचले आणि त्यांनी सेटवरच्या आरोग्य सुविधेची पाहणी केली. सौम्याच्या पर्सनल हेअर ड्रेसरला क्वारंटाइन करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
काल-परवाच ‘मेरे साई’ या मालिकेच्या सेटवरच्या एकाला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर या मालिकेचे शूटींग काही काळ थांबवण्यात आले होते. यापाठोपाठ ‘एक महानायक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचे अभिनेते जगन्नाथ निवंगुणे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
सध्या जगन्नाथ यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच ते बरे होऊन परत येतील, असा विश्वास प्रॉडक्शन हाऊसने व्यक्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून सर्व मालिका व चित्रपटांचे शूटींग बंद होते. यानंतर सरकारने काही अटी व शर्तींसह शूटींगला परवानगी दिली. सरकारच्या या गाइडलाइन्सनुसार शूटींगला सुरुवात झालीय. पण सर्व आवश्यक ती काळजी घेऊनही शूटींगच्या सेटवरही कोरोनाचा शिरकाव होत असल्याचे पाहून टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.