‘भाभीजी घर पर है’ ( Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेतील सक्सेनाजी (Saanand Verma Aka Anokhelal Saxena) याला तुम्ही ओळखताच. त्याचं खरं नाव, सानंद वर्मा (Saanand Verma). मालिकेत सतत थप्पड खाणारा आणि करंट लागल्यावर ‘आय लाइक इट’ म्हणणारा सक्सेनाजी प्रेक्षकांना पोट धरून हसवतो. आज सानंद टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. बॉलिवूडमध्येही त्यानं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा खचितच नव्हता. टाईम्स ऑफ इंडियाला एका ताज्या मुलाखतीत तो या प्रवासाबद्दल बोलला.
सानंद मूळचा बिहारचा. लहानपणापासूनच त्याला अभिनयात रूची होती. पण घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे वयाच्या 8 व्या वर्षापासून त्यानं काम करायला सुरूवात केली. पुस्तकं विकली, शेतात मोलमजुरी केली. 12 वर्षाचा झाला आणि त्याने मुलांची शिकवणी सुरू केली. पुढे त्यानं कार्पोटरेट कंपनीत नोकरी पकडली आणि 50 लाख रूपयांचं वार्षिक पॅकेजवर काम सुरू केलं. खरं तर 50 लाखाचं पॅकेज मोठं पॅकेज होतं. पण सानंदला अॅक्टिंगचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता. एक दिवस अचानक त्यानं नोकरीवर लाथ मारली आणि अॅक्टिंग करायचं ठरवलं.
तो म्हणाला, ‘ अभिनय ही माझी आवड होती. त्यामुळे मी त्याच क्षेत्रात काम करणं पसंत केलं. नोकरी सोडून मी 50 किमी चालत जाऊन आॅडिशन दिलं. अनेकांनी मला वेड ठरवलं. मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होतो. रोज मिरा रोड ते अंधेरी अशा वेगवेगळ्या मालिकांसाठी मी आॅडिशन देत सुटलो. खिशात पैसे नव्हते, मी माझी दुचाकीही विकली होती. पण अॅक्टिंग करायचीच, ही जिद्द कायम होती. अखेर माझ्या त्या कष्टांचे चीज झालं. 2010 पासून मी प्रोफेशनल अॅक्टर म्हणून काम करतोय. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेआधी मी 20 मालिका केल्यात. पण सगळ्यांत मी केवळ कॅमिओ रोल केलेत. कारण मला टीव्ही अभिनेता ही ओळख बनवायची नव्हती. मला बॉलिवूड अॅक्टर बनायचं होतं. मी अनेक सिनेमातही काम केलं.