देशभर कोरोनाने कहर केला आहे. कोरोना रूग्णांचा रोजचा आकडा लाखांवर पोहोचला आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता ‘भाभीजी घर पर हैं’ या लोकप्रिय मालिकेतील गोरी मेम अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खुद्द नेहाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
नेहाने इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. दोन वर्ष मी वाचले, पण आता या विषाणूने मलाही ग्रासलं आहे. माझा कोव्हिडी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मी घरी क्वारंटाइन आहे. गेल्या काही दिवसांत मी कुणालाही भेटलेली नाही. अंतर्मुख असणं कधीकधी फायदेशीर ठरतं, असं तिने लिहिलं आहे.
नेहाचा जन्म मुंबईत झाला. तिने झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेतून सिनेक्षेत्रात एंट्री घेतली. आतापर्यंत तिनं मराठी, तेलूगु, तमिळ आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. 1999 मध्ये तिनं पहिल्यांदा प्यार कोई खेल नही या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.
आजच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याची बातमी आली. लता यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तथापि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोना संसर्ग झाला आहे. यात वीरदास, कमल हासन, महेश बाबू, सुजैन खान, खूशी कपूर, जान्हवी कपूर, स्वरा भास्कर, एकता कपूर, अर्जुन कपूर, मृणाल ठाकूर, नकुल मेहता, शिखा सिंह, सुमोना चक्रवर्ती अशा अनेकांचा समावेश आहे. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. मालिका आणि चित्रपटांच्या सेटवर विशेष काळजी घेतली जात आहे. आत्तापर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाने गाठलं आहे. सर्वजण होम आयसोलेशनमध्ये राहून आपल्यावर उपचार घेत आहेत.