Join us

निवृत्तीनंतरच्या प्रेमाची गोष्ट! 'भाडिपा'चं सरप्राईज; नवरा-बायकोच्या हळुवार नात्याची 'क्यूट' वेब सीरिज   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 4:35 PM

वयाची साठी म्हणजे सेवानिवृत्तीचं वर्ष. इथून पुढे आयुष्याची तिसरी इनिंगच सुरू होते. या टप्प्यात नवरा बायकोचं नातं कसं फुलतं हे सिरीजमधून अप्रतिमरित्या मांडण्यात आलंय.

>> ऋचा वझे

'सिक्स्टीज इज द न्यू थर्टीज' असं म्हणतात. साचेबद्ध चाललेलं आयुष्य अचानक कसं वळण घेतं ते या वयात कळतं. 'तू अभी तक है हसीन' नावातच मोठा अर्थ दडला आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नातं नव्याने फुलत असतं म्हणून ते म्हणत असावेत एकमेकांना की तू अभि तक है हसीन. आजवर खास करून तरुणाईसाठी वेगवेगळ्या सीरिज बनवणाऱ्या भाडिपाने 'चिरतरूण' प्रेमाची गोष्ट सांगून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

वयाची साठी म्हणजे सेवानिवृत्तीचं वर्ष. इथून पुढे आयुष्याची तिसरी इनिंगच सुरू होते. या टप्प्यात नवरा बायकोचं नातं कसं फुलतं हे सिरीजमधून अप्रतिमरित्या मांडण्यात आलंय. निवृत्तीनंतर नवरा कायम घरी आहे हे बघितल्यावर बायकोची नाही म्हणलं तरी चीडचीड सुरू होते. स्वाभाविकच आहे तीस वर्षं नवरा रोज कामाला गेल्यावर बायकोला तिला घरात मिळणाऱ्या 'स्पेस' ची सवयच झाली असते. पण आता नवऱ्याची प्रत्येक गोष्टीत लुडबुड होतेय हे बघितल्यावर दोघांमध्ये होणारी भांडणं मजेशीर आहेत. भांडण झालं तरी त्यात प्रेम दडलेलं असतंच . नवऱ्याने न मागताही त्याला चहा हवाय हे ओळखणं आणि चहा आणून देणं हे तिचं त्याच्यावर असलेलं प्रेमच आहे की. तर बायकोशिवाय नवऱ्याचं पानही हलत नाही हे त्याचं तिच्यावर असलेलं प्रेमच.

पण अचानक आयुष्यात असाही टप्पा येतो जेव्हा दोघांना जाणीव होते की आयुष्य खूप छोटं आहे. आज आहोत पण उद्या आपल्यापैकी कोणी एक नसेल तर. विचारही नको वाटतो ना. एकमेकांशिवाय जगायचं कसं, भांडणाच्या नादात खूप काही बोलायचंही राहूनच गेलंय. कितीतरी इच्छा आहेत ज्या दोघांना सोबत पूर्ण करायच्या आहेत. नात्यातला रोमान्स परत आणायचा आहे. या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते जोडपं नव्याने जगायला सुरुवात करतं. इथे सीरिज तर संपते, पण त्यांचं आयुष्य खरं तर सुरू झालेलं असतं.

सुहिता थत्ते आणि किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांनी जोडप्याची भूमिका सुंदररित्या निभावली आहे. किशोर कदम यांची ही भूमिका तर त्यांच्या चाहत्यांसाठी सरप्राईजच आहे असं म्हणावं लागेल. कारण, किशोर कदम आणि गंभीर भूमिका असं एक समीकरण झालंय. पण, या सीरिजमध्ये त्यांनी साकारलेला अल्लड, निरागस, तितकाच विनोदी आणि बायकोवर प्रचंड प्रेम करणारा नवरा पाहून आश्चर्याचा धक्का बसेल.

आजकालची पिढी ही प्रेमाला लगेच my soulmate, my forever अशी नावे देऊन मोकळी होते. पण साठीतली पिढी ते फॉरेव्हर आयुष्य खरंच जगत आहे आणि याची त्यांना जाणीवही नाहीए. मुळात असे लेबल लावायची त्यांना गरजच पडत नाही. त्यांच्यात खूप प्रेम आहे फक्त ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. असंच नाजूक नातं या सीरिजमधून अनुभवायला मिळतं. 

एकूण पाच एपिसोडची ही सिरीज अगदी पहिल्या एपिसोडपासूनच तुम्हाला गुंफून ठेवते. प्रत्येक एपिसोडमध्ये नवरा बायकोचं नातं हळुवार फुलत जातं आणि शेवटी दोघेही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात. किती सुंदर कल्पना आहे ही. तुमच्या आमच्या घरातलीच तर गोष्ट आहे.  थोडक्यात काय तर, आपल्या आयुष्याकडे अशाही नजरेतून बघता येऊ शकतं की, याची जाणीव करून देणारी आहे 'तू अभि तक है हसीन!'

सीरिजचे पाचही एपिसोड आता प्रदर्शित झालेत त्यामुळे लगेच Binge Watch करायला हरकत नाही.

टॅग्स :यु ट्यूबकिशोर कदममराठी अभिनेतामराठी