‘मैंने प्यार किया’ या पहिल्याच चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री सुमारे दशकभरानंतर पुन्हा एकदा फिल्मी दुनियेत परतणार आहे. एकेकाळी भाग्यश्रीने प्रेक्षकांना वेड लावले होते, पण अचानक ही भाग्यश्री बॉलिवूडमधून गायब झाली होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड अलर्ट - द वॉर विदिन’ या सिनेमात ती अखेरची दिसली होती. तेव्हापासून सलमानच्या ‘सुमन’ला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक होते. पण तसे काहीही झाले नाही. भाग्यश्रीने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न त्यामुळे चाहत्यांच्या मनात कायमचा रूतून बसला होता. पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळालेय. होय, इतक्या वर्षांनंतर खुद्द भाग्यश्रीने याचा खुलासा केला आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले. कुटुंबासाठी बॉलिवूडचे करिअर सोडल्याचे ती म्हणाली. हा निर्णय घेणे कठीण होते का? असे विचारले असता तिने सांगितले, ‘हो सुद्धा आणि नाही सुद्धा. कारण अभिनय करताना मला आनंद मिळत होता आणि मी आणखी उत्तम अभिनय करू शकते, असा विश्वासही माझ्यात निर्माण झाला होता. त्यामुळे सुरुवातीला हा निर्णय जड गेला खरा. पण मुलगा अभिमन्यूच्या जन्मानंतर मी त्याच्यात रमले आणि माझे संपूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रीत झाले. मातृत्वाचा आनंद घेत असताना करिअरचा मला पुरता विसर पडला होता. आज इतक्या वर्षांनंतर अभिमन्यूच मला चित्रपटात परतण्यासाठी प्रेरित करतोय. गेल्या दोन वर्षांपासून त्याने मला यासाठी प्रेरित केले. लहान असताना आई आपल्या अवतीभवती राहावी, असे मुलांना वाटते. पण आता अभिमन्यू स्वत: चित्रपटात काम करतोय आणि अभिनयाचा आनंद घेतोय. त्यामुळेच हा आनंद काय असतो, हे तो समजू शकला. ’
भाग्यश्री लवकरच ‘सीताराम कल्याण’ या कन्नड चित्रपटात भाग्यश्री झळकणार आहे. यानंतर ती ‘किट्टी पार्टी’ शिवाय ‘2 स्टेट्स’च्या तेलगू रिमेकमध्ये दिसणार आहे. इतकेच नाही तर प्रभाससोबतही एक सिनेमा तिने साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘प्रभास 20’असल्याचे कळतेय. याशिवाय एका हिंदी सिनेमातही तिची वर्णी लागली आहे. तूर्तास या हिंदी सिनेमाचे नाव गुलदस्त्यात आहे. 1989 साली ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाद्वारे भाग्यश्रीने बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली होती.
चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुकही झाले. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि ‘सुमन’च्या करिअरला ब्रेक लागला. विवाहबंधनात अडकल्यानंतर तिने तीन चित्रपट केलेत आणि यानंतर, अभिनयातून ब्रेक घेतला.