Join us

जाणून घ्या भरत जाधवच्या कुटुंबियांविषयी आणि पाहा त्यांचे फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 6:28 PM

भरत जाधवच्या पत्नीचे नाव सरिता जाधव असून त्यांना दोन मुले आहेत.

ठळक मुद्देभरतच्या मुलांच्या जन्माच्या आठवणींविषयी तो सांगतो, माझी मोठी मुलगी सुरभी जन्मली, त्यावेळी हा आनंद कशाप्रकारे व्यक्त करू हेच मला कळत नव्हते.

भरत जाधवने आजवर अनेक मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असून आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याने अनेक हिंदी चित्रपटात देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. भरत हा अतिशय सामान्य कुटुंबातील असून त्याचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. लालबाग परळमधील एका चाळीत त्याचे बालपण गेले.

शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारापासून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर त्याची ऑल द बेस्ट ही एकांकिका प्रचंड गाजली. यावर आधारित असलेल्या ऑल द बेस्ट या नाटकाला तर लोकांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर श्रीमंत दामोदर पंत, अधांतर, सही रे सही यांसारखी अनेक हिट नाटकं त्याने रंगभूमीला दिली.

भरत जाधवच्या पत्नीचे नाव सरिता जाधव असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा त्यांनी अशी ही आशिकी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सांगितला होता. सरिताने सांगितले होते की, भरतचा तिच्या ऑफिसमध्ये फोन आला होता. ते दोघे पहिल्यांदा भेटणार होते. लवकर निघण्यासाठी ती वरिष्ठांची परवानगी मागायला गेली होती तर येशील ना उद्या... असे विचारत तिच्या वरिष्ठांनी तिची टर उडवली होती.

त्या दोघांनी खिलाडी हा चित्रपट सगळ्यात पहिल्यांदा एकत्र पाहिला होता. हा चित्रपट पाहाण्यात नव्हे तर केवळ तिच्यासोबत गप्पा मारण्यात आणि वेळ घालवण्यात भरतला रस होता अशी त्याने कबुली दिली होती.

भरतच्या मुलांच्या जन्माच्या आठवणींविषयी तो सांगतो, माझी मोठी मुलगी सुरभी जन्मली, त्यावेळी हा आनंद कशाप्रकारे व्यक्त करू हेच मला कळत नव्हते. तर आरंभ या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या दिवशी प्रपंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होते आणि त्यानंतर एका नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगासाठी बोरिवलीला पोहोचल्यावर मुलगा झाल्याचा त्याला निरोप मिळाला होता. त्याच्या पत्नीसोबत त्यावेळी कोणी आहे का याचे त्याला टेन्शन आले होते. त्याच दिवशी अंकुश चौधरी त्याचे नाटक पाहायला आला होता. त्याने अंकुशला थेट केएम रुग्णालयात जायला सांगितले आणि रात्री उशिरा त्याने लांबून बाळ पाहिले होते. रात्रीची वेळ असल्याने वॉर्डमध्ये जायची परवानगी भरतला मिळाली नव्हती. तसाच तो दुसऱ्या दिवशी नाटकाच्या दौऱ्याला दहा दिवसांसाठी गेला होता. तिथून आल्यावर त्याने त्याच्या बाळाला व्यवस्थितपणे पाहिले होते. 

टॅग्स :भरत जाधव