'तुमचं काम पाहिले, हे पैसे घ्या'; भरत जाधवला प्रेक्षकाने परत केले तिकीटाचे पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:34 AM2023-08-18T09:34:09+5:302023-08-18T09:35:25+5:30
Bharat jadhav: एका चाहत्याने भरतलै नाटकाचे पैसे परत केले. विशेष म्हणजे या मागचं त्याने सांगितलेलं कारण जास्त चर्चेत आलं आहे.
आपल्या दर्जेदार अभिनयामुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव.नाटक, मालिका, एकांकिका आणि सिनेमा अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्याचा वावर आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. विशेष म्हणजे भरत आज प्रत्येक चाहत्याला त्याच्या कुटुंबातील एक भाग असल्यासारखा वाटतो. त्यामुळे चाहते त्याच्यासोबत दिलखुलासपणे वागतात. त्यामुळे भरत जाधवला चाहत्यांचे अनेक अनुभव आले आहेत. यामधलाच एक भन्नाट अनुभव त्याने शेअर केला. एका चाहत्याने त्याला नाटकाचे पैसे परत केले. विशेष म्हणजे या मागचं त्याने सांगितलेलं कारण जास्त चर्चेत आलं.
अलिकडेच भरत जाधवने (bharat jadhav) एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सही रे सही या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्याला आलेला अनुभव सांगितला. नाशिकमध्ये सही रे सही या नाटकाचा प्रयोग करण्यात आला होता. यावेळी एका प्रेक्षकाने चक्क नाटकाचे पैसे त्याला परत केलं.
"नाशिकमध्ये सही रे सहीचा प्रयोग झाला. त्यावेळा एका प्रेक्षकाकडे चुकून नाटकाची दोन तिकीटं आली. तो बाल्कनीत बसला होता. नाटक संपल्यावर अनेक जण मला भेटायला आले. तसा तोही आला आणि , मला पैसे दिले. म्हणाला, हे घ्या वरचे पैसे..मी म्हटलं कसले? त्यावर तो म्हणाला, मी तुमचं एक तिकीट फुकट घालवलं. माझ्याकडे चुकून दोन तिकीटं आली होती. पण, मी खाली जाऊन एक तिकीट परत करायचा कंटाळाल केला. त्यामुळे माझ्या बाजूची एक खुर्ची रिकामीच राहिली. पण तुमचं काम पाहिलं, तुम्हा सर्वांची मेहनत पाहिली आणि इतक्या हाउसफुल प्रयोगातील एक सीट माझ्यामुळे रिकामी राहिली हे योग्य नाही. त्यामुळे हे त्या तिकिटाचे पैसे,” असं म्हणत या प्रेक्षकाने भरत जाधवला पैसे परत केले.
दरम्यान, भरत जाधवचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे. भरत जाधवने सही रे सही, मोरूची मावशी, अशा कितीतरी गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं आहे.