लक्ष्मीकांत यांच्या आठवणीने भावूक झाला भरत जाधव, या चित्रपटाला मानतो त्यांचा आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 12:42 PM2020-12-19T12:42:04+5:302020-12-19T12:43:57+5:30
अभिनेता भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक भावनिक पोस्ट नुकतीच फेसबुकवर शेअर केली आहे.
कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चतुरस्त्र अभिनेता म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी ते डगमगले नाहीत आणि अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे साऱ्यांचा ‘लाडका लक्ष्या’ म्हणून त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. साऱ्यांचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाही तर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. आजही त्यांच्या आठवणीने त्यांच्या फॅन्सचे, सहकलाकारांचे डोळे पाणावतात.
अभिनेता भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक भावनिक पोस्ट नुकतीच फेसबुकवर शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की,लक्ष्या मामा..! खूप आठवणी आहेत. आम्हा नवोदितांना त्यांनी ज्या प्रकारे वेलकम केलं, आधार दिला... त्यांनी आपल स्टारपण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना मामा म्हणून हाक मारू शकायचो.
खूप काही शिकलो त्यांच्याकडून. त्यांच्याबद्दल सांगायची सगळ्यात मोठी आठवण म्हणजे पछाडलेला चित्रपट.
'सही रे सही' जोरात सुरू होतं. अशातच जानेवारी २००३ ला महेश कोठारे सरांनी पछाडलेला साठी विचारलं. आणि त्यांना लगेच काम सुरू करायचं होतं. मला त्या एका वर्षात ऑगस्ट २००३ पर्यंत सही चे जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते. त्यामुळे मी त्यांना नकार कळवला.
मध्ये काही महिने गेले आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्या मामांचा फोन आला की," तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे... महेशला पटकन जाऊन भेट मी तुझ्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय... तो पिक्चर सोडू नकोस."
मग त्याच रात्री उशिरा महेश सरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि तिथून लक्ष्या मामांना कळवलं की, मी पछाडलेला करतोय.
सांगायचा मुद्दा हा की, इतका मोठा माणूस... कोणालाही घेऊ शकले असते. पण त्यांनी ती एवढी मोठी संधी मला दिली. पछाडलेलाला मी त्यांचा आशीर्वाद मानतो.
विनम्र अभिवादन!