Join us  

"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 8:49 AM

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातील भारूडाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. १९ वर्षांपूर्वी आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशातच आता हा चित्रपट वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे. चित्रपटातील सध्याचे राजकारण, परस्थितीवर भाष्य करणारे एक भारुड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शुक्रवारी ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र या चित्रपटातील एका भारुडाविषयी जोरदार चर्चा सुरु झाली. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या भारुडामधील काही शब्दांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  चित्रपटामध्ये एका पुढाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ जाधवने ट्रेनमध्ये हे भारुड सादर केलं आहे.  राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर या भारूडातून मार्मिक भाष्य केलं असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.

व्हायरल होत असलेल्या भारुडामध्ये सिद्धार्थ जाधव ट्रेनच्या डब्ब्यामध्ये गणरायाला भारूडातून साकडं घालताना दिसत आहे. यावेळी सिद्धार्थ जाधव "देवा जर का तू मला पावला, सत्ताधारी खासदारकी लाभली मला, मुकूट घालीन ५० खोक्यांचा तुला," असं म्हणतो. यावर 'हे नवस बोलत आहेत की लाच देत आहेत?' असा प्रश्न स्वप्नील जोशी करतो. "जनतेचं भलं कराया, विरोधी पक्ष फोडाया, बुद्धी द्यावी गणराया," अशीही मागणी सिद्धार्थ जाधव करतो. यावर सचिन पिळगावकर अशी बुद्धी गणराय देत नाही," असं म्हणतात. 

यावेळी कार्यकर्त्यांचे भलं कोण करणार असं अशोक सराफ म्हणतात. त्यावर कार्यकर्त्यांचे भले केले तर साहेबांच्या सतरंज्या कोण उचलणार असं सचिन पिळगावर म्हणतात. त्यावर साहेबांच्या सतरंज्या उचलणं आमचं भाग्य आहे, असं जयवंत वाडकर म्हणतात. या भारूडातून गेल्या काही वर्षात राज्यात सुरु असलेल्या पक्षांतर, पक्ष फोडीचे राजकारण यावर योग्य भाष्य करण्यात आल्याचे सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आमच्या कलाकारांनी, भारूड, पोवाडा, तमाशा, ओव्या, गीतांमधून जनप्रबोधन केलं आहे. आरसा दाखवलाय, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिली जात आहे.

दरम्यान, इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार ‘नवरा माझा नवसाचा २’ ने पहिल्याच दिवशी दोन कोटी रुपयांची कमाई केली. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या चित्रपटामध्ये सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी स्टारकास्ट आहे.

टॅग्स :महाराष्ट्रसचिन पिळगांवकरअशोक सराफसिद्धार्थ जाधव