प्रेक्षकांचा लाडका विनोदी कलाकार भाऊ कदम (Bhau Kadam) 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून लोकप्रिय झाला. १० वर्षांनी नुकताच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता भाऊ कदम निलेश साबळे आणि ओंकार भोजनेसोबत 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या नवीन कार्यक्रमात दिसत आहे. 'चला हवा येऊ द्या' चे इतर कलाकारही वेगवेगळी कामं करत आहेत. कुशल बद्रिकेने तर हिंदी कॉमेडी शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. भाऊ कदमलाही या हिंदी शोची ऑफर मिळाली होती. मात्र त्याने ती नाकारली. याच कारण त्याने 'लोकमत फिल्मी' च्या मुलाखतीत स्पष्ट केलं.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत भाऊ म्हणाला, "ऑफर आली होती मला. पण मी नाही म्हटलं. आता थांबतो मला नाही करायचंय असं मी सांगितलं. कारण इकडेही विनोदी तिकडेही विनोदी असं मी बोललो. पण खरं कारण तर माझं वेगळंच होतं. जेव्हा आमचं गॅप घ्यायचं चाललं होतं तेव्हा मला वाटलं की थांबा ना थोडावेळ जरा रिलॅक्स होऊ. तेवढ्यात हे हिंदी करायचं म्हणलं की अवघड. मला नवीन ठिकाणी रुळायलाही जरा वेळ लागतो."
तो पुढे म्हणाला, "हिंदीत आपल्याला मराठीत जेवढा मान मिळतो तेवढा मिळेलच का तोही प्रश्न होता. तिथे रमायलाही वेळ लागेल असं वाटलं. ओळखीचे कोणी नाहीत. इथे मी साबळे असल्याने बिंधास्त असतो. तिकडे मला तो कंफर्ट नसता वाटला. मराठीत कसं अगदी घरासारखं वाटतं जेवढा मी मोकळा होऊ शकतो तसा तिकडे त्या भाषेमुळे नाही होऊ शकत. म्हणून मी नकार दिला."
कुशल बद्रिके सध्या 'मॅडनेस मचाएंगे' या कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री हेमांगी कवीही आहे. याच शोची भाऊलाही ऑफर मिळाली होती. मात्र त्याने नम्रपणे नकार देणं पसंत केलं.