झी मराठी वाहिनीवर सर्वात जास्त गाजलेला विनोदी कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya). कार्यक्रमातील तुफान कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवलं. तब्बल १० वर्ष कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र काही महिन्यांपूर्वी चला हवा येऊ द्याने सर्वांचा निरोप घेतला. टीआरपी मध्ये शो घसरत होता त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. नुकतंच भाऊ कदम (Bhau Kadam) यांनी शोचा टीआरपी घसरण्याचं कारण सांगितलं.
'चला हवा येऊ द्या' मध्ये भाऊ कदम म्हणजे सर्वांचेच आवडते कलाकार. अचूक टायमिंग साधत त्यांचे पंचेस आजही प्रेक्षकांना खूप हसवतात. नुकतंच 'रेडिओ सिटी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "असं काही घडतं तेव्हा मी त्या गोष्टीपलीकडचा विचार करतो. दुसऱ्या वाहिनीवरही एक विनोदी कार्यक्रम सुरु होता. पण त्यांच्याकडे वेगवेगळे लेखक आहेत. त्यामुळे व्हेरिएशन होतं. आमच्या कार्यक्रमात एकच लेखक होता. इतकी वर्ष एकच माणूस लिहित होता. मग असं किती व्हेरिएशन दिसणार होतं. आपण केलेलं सगळंच हिट होईल असंही नाही. प्रत्येक स्किट वाजेलच असंही नाही. कोणत्याही प्रक्रियेत अपयश येतंच. म्हणून तर ही यशाची पहिली पायरी असते. खाली आल्यावरच आपण पुन्हा वर जाऊ शकतो. यात वेगळीच मजा असते."
'चला हवा येऊ द्या'मध्ये डॉ निलेश साबळे सूत्रसंचालन करत होते. यामधून भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके हे कलाकार स्टार झाले होते. 'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर भाऊ कदम यांनी अनेक महिन्यांचा ब्रेक घेतला होता. आता ते 'करुन गेलो गाव' आणि 'सिरियल किलर' या दोन नाटकांचे प्रयोग करत आहेत.